अकोला: विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिक्षण व संशोधनातील कामगिरी खालावली असून, विद्यापीठातील संशोधनाचा शेतकºयांना कवडीचाही फायदा होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. कृषी विद्यापीठ विदर्भातील शेतकºयांसाठी पांढरा हत्ती ठरत असल्याचे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर)ने जाहीर केलेल्या मानांकन यादीवरून स्पष्ट होत आहे. कृषी विद्यापीठाच्या कामगिरीत सुधारणा न झाल्याने, ‘आयसीएआर’ने कृषी विद्यापीठाला मानांकनात ४८ वा क्रमांक दिला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीसुद्धा विद्यापीठाला हाच क्रमांक मिळाला होता. अकोल्यातील कृषी विद्यापीठापेक्षा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची कामगिरी सरस ठरली असून, या विद्यापीठाने मानांकनात २४ वा क्रमांक पटकावला आहे.भारतीय कृषी संशोधन परिषदेची (आयसीएआर) अधिस्वीकृती समिती १० डिसेंबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिक्षण व संशोधनाचा आढावा घेण्यासाठी कृषी विद्यापीठात आली होती. अधिस्वीकृती समितीने कृषी विद्यापीठातील शिक्षण, संशोधन आणि विस्ताराचा आढावा घेतला होता. यादरम्यान समितीला कृषी विद्यापीठाच्या मानांकनात सुधारणा करावी, या दृष्टिकोनातून समाधानकारक कार्य दिसून आले नाही. त्यामुळे आयसीएआरने कृषी विद्यापीठाचा गतवर्षीचा मानांकनातील ४८ वा क्रमांक कायम ठेवला. यावरून कृषी विद्यापीठातील कामगिरीचा आलेख घसरत असल्याचे दिसून येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा मानांकन क्रमांक हा पहिल्या दहामध्ये होता; परंतु गत काही वर्षांमध्ये कृषी विद्यापीठाकडून शेतकºयांसाठी विशेष संशोधन आणि शैक्षणिक दर्जा उंचावत नसल्यामुळे कृषी विद्यापीठ आयसीएआरच्या मानांकनात ४८ व्या क्रमांकावर फेकल्या गेले आहे. गत तीन वर्षांपूर्वी आयसीएआर अधिस्वीकृती समितीने राज्यातील कृषी विद्यापीठाचा आढावा घेतला होता. या आढाव्यातही समितीला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांचे शिक्षण, संशोधन व विस्तार काम समाधानकारक दिसून आले नव्हते. त्यामुळेच ‘आयसीएआर’ने कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती रद्द केली होती, हे येथे उल्लेखनीय.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले. बोंडअळीसारख्या संकटावर नियंत्रण मिळवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. संशोधनातही विद्यापीठ अग्रेसर आहे. दरवर्षी १0 लाख शेतकरी कृषी विद्यापीठाला भेट देतात. साडेतीन लाख कलमा शेतकºयांना उपलब्ध करून दिल्या; परंतु कृषी विद्यापीठाचा मानांकन क्रमांक का घसरला, याबाबत आम्ही चिंतन करणार आहोत.-डॉ. विलास भाले, कुलगुरू,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ.