- सदानंद सिरसाटअकोला: लाभार्थींना बायोमेट्रिक ओळख पटवूनच एइपीडीएसद्वारे धान्य वाटप करण्याला फाटा देत सप्टेंबर महिन्यातील ऐन निवडणुकीच्या धामधुमीत १६ जिल्ह्यांमध्ये तब्बल २० हजारांवर शिधापत्रिकांधारकांचे धान्य नॉमिनींना वाटप केले जात आहे. या प्रकरणातही अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपे यांनी सर्वच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना २५ आॅक्टोबरपर्यंत अहवाल मागवला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे.शासनाकडून पॉसद्वारे विक्री झालेल्या धान्याचा दैनंदिन आढावा घेतला जातो. ज्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये नो-नेटवर्क आहे. त्या ठिकाणी शिधापत्रिकाधारकांचे आधार कार्ड पडताळणीऐवजी नॉमिनींची ओळख पटवून धान्य वाटपाची मुभा आहे. नॉमिनींची ओळख पटवण्यासाठी पुरवठा विभागाच्या रुट आॅफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. नो-नेटवर्क असलेल्या क्षेत्रातच ही सूट असताना अनेक जिल्ह्यांमध्ये नेटवर्क क्षेत्रातही आधार लिंकिंगविना नॉमिनींना धान्य वाटप केले जाते. त्यातून धान्याचा काळाबाजार करण्याच्या संधीचा पुरेपूर वापर दुकानदार, पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून केला जातो. हा प्रकार विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत प्रचंड वाढला.सप्टेंबर २०१९ मधील नॉमिनींना होत असलेल्या वाटपाच्या आकडेवारीत कमालीची वाढ झाली आहे. १६ जिल्ह्यांमध्ये तर काळाबाजार करण्याची हीच संधी आहे, हे ठरवत वाटप होत आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या वाटपाच्या आढाव्यात १६ जिल्ह्यांत नॉमिनींना वाटपाचे प्रमाण उतरत्या क्रमाने काढण्यात आले. त्यापैकी सहा जिल्ह्यात आॅगस्टमध्ये २,३५,३८० शिधापत्रिकांचे धान्य नॉमिनींना देण्यात आले. ती संख्या सप्टेंबरमध्ये २,५०,३६५ एवढी झाली आहे. तब्बल १४,९८५ शिधापत्रिकांची वाढ झाली. तर उर्वरित १० जिल्ह्यांमध्ये आॅगस्टमधील वाटपाची संख्या १,१६,३५२ असताना सप्टेंबरमध्ये ती १,२१,१६४ वर पोहोचली आहे. ४,८१२ शिधापत्रिकांचे धान्य नॉमिनींना देण्यात आले. आधीच्या महिन्यातील नॉमिनींना वाटपाचे प्रमाण ५० टक्के कमी करण्याऐवजी त्यामध्ये १५ ते २० टक्के वाढ करण्याचा उफराटा प्रकार पुरवठा यंत्रणेमध्ये सुरू आहे. त्यातून धान्याचा काळाबाजार करण्याची संधी दिली जात आहे.
- नॉमिनींना धान्य वाटप करणारे जिल्हेनॉमिनींच्या संख्येत प्रचंड वाढ झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती प्रथम आहे. त्यामागे उतरत्या क्रमाने रायगड, अहमदनगर, नंदुरबार, रत्नागिरी, ठाणे, गडचिरोली, बीड, सांगली, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, बुलडाणा, नाशिक, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे. इतर नऊ जिल्ह्यातही प्रमाण घटण्याऐवजी वाढले आहे.