- प्रवीण खेते
अकोला: कोरोना काळात रुग्णालये, दवाखान्यांमधील गर्दी टाळण्यासाठी शासनातर्फे ‘ई-संजीवनी’ या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून रुग्णांना घरी बसूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे शक्य झाले; मात्र या अंतर्गत राज्यातील केवळ १२ हजार १२१ रुग्णांनीच वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला. विदर्भात नागपूरनंतर अकोल्यातील ३८१ रुग्णांनी या अंतर्गत वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला; परंतु हे प्रमाण खूप कमी असल्याचे दिसून येते.
कोविडच्या संसर्गाचा धोका टाळण्याच्या उद्देशाने ‘टेली आयसीयू’च्या धर्तीवर केंद्र शासनाने ‘ई-संजीवनी’ सुरू केली. या ॲपच्या माध्यमातून रुग्णांना घरी बसूनच थेट डॉक्टांशी संवाद साधणे शक्य झाले; परंतु या ॲपच्या वापरावरून नागरिकांमधील उदासीनता समोर येत आहे. मागील आठ महिन्यात अकोला जिल्ह्यातील केवळ ३८१ रुग्णांनीच याचा वापर केला. राज्यात ई-संजीवनीचा सर्वाधिक उपयोग पुणे जिल्ह्यात घेण्यात आला. जिल्ह्यातील १,७५५ रुग्णांनी ई-संजीवनीच्या माध्यमातून उपचार घेतला, तर नंदुरबार जिल्ह्यातील केवळ १० रुग्णांनीच ई-संजीवनीचा उपयोग घेतला. ही संख्या राज्यात सर्वात कमी आहे.
घरबसल्या ओपीडीची सुविधा
ई-संजीवनीच्या माध्यमातून रुग्णांना ऑनलाइन ओपीडीची सुविधा उपलब्ध होत आहे. यामध्ये रिअल टाइम टेलिमेडिसनी, राज्यसेवा डॉक्टर, व्हिडिओ कॉलद्वारे सल्लामसलत, चॅटसेवा रुग्णांसाठी उपलब्ध आहे. यासाठी रुग्णांना कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
असा करा ई-संजीवनीचा उपयोग
- गुगल प्लेस्टोअरवरून ई-संजीवनी ॲप डाउनलोड करा.
- नोंदणी व टोकन जनरेशन करा.
- लॉगइन करा.
- प्रतीक्षालयावर क्लिक करा.
- सल्लामसत करा.
ई-संजीवनीचा सर्वाधिक उपयोग झालेले जिल्हे
जिल्हा - रुग्णसंख्या
पुणे - १,७५५
रायगड - ९३२
बीड - ८८३
सोलापूर - ८२९
ठाणे - ८१७
नागपूर - ७७३
मुंबई - ७७०
नांदेड - ७०५
अहमदनगर - ६३२
लातुर - ४६०
अकोला - ३८१
वर्धा - ३२४
सर्वात कमी उपयोग असलेले जिल्हे
जिल्हा - रुग्णसंख्या
सांगली - ५३
बुलडाणा - ७७
जळगाव - ८२
परभणी - ७९
गडचिरोली - ७६
धुळे - ६४
चंद्रपूर - ६३
जालना - ५९
हिंगोली - ५८
सिंधुदुर्ग - ३७
रत्नागिरी - ३२
गोंदिया - ३२
नंदुरबार - १०
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना घरीबसूनच वैद्यकीय सेवा मिळावी, या अनुषंगाने ‘ई-संजीवनी’ सुरू करण्यात आली; मात्र नागरिकांनी त्यांचा उपयोग घेतला नाही. विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक उपयोग अकोला जिल्ह्यात झाला असला, तरी हे प्रमाण कमी आहे. नागरिकांनी ई-संजीवनीचा लाभ घ्यावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.