विशेष गाड्यांद्वारे अकोला स्थानकाला केवळ ६० हजारांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:12 AM2020-09-14T11:12:35+5:302020-09-14T11:12:47+5:30
विद्यार्थ्यांसाठी मध्य रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांद्वारे अकोला स्थानकाला केवळ ६० हजार रुपयांची कमाई झाल्याचे समोर आले आहे.
अकोला : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) व नौदल अकादमी (एनए)च्या रविवार, ६ सप्टेंबर रोजी राज्यातील मुंबई व नागपूरसह मोठ्या शहरांमध्ये पार पडलेल्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्य रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांद्वारे अकोला स्थानकाला केवळ ६० हजार रुपयांची कमाई झाल्याचे समोर आले आहे.
एनडीए व एनएच्या परीक्षांमध्ये सहभागी होणाºया विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांपर्यंत जाण्यासाठी मध्य रेल्वेने ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत अप व डाउन अशा २३ विशेष गाड्या चालविल्या. यापैकी आठ गाड्या अकोला स्थानकावरून गेल्या. यामध्ये अकोला ते नागपूर ही मेमू गाडी रविवारी रात्री रवाना झाली होती. या सर्व गाड्या परतीच्या प्रवासातही अकोला स्थानकावरून गेल्या. या आठ गाड्यांच्या आवागमनातून अकोला रेल्वेस्थानकाला मात्र विशेष नफा झाला नसल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात आलेल्या या गाड्यांमधून अकोला रेल्वेस्थानकाला फक्त ६० हजार रुपयांची कमाई झाली. कमाईच्या बाबतीत भुसावळ रेल्वे मंडळाच्या इतर स्थानकांवरही हीच स्थिती असल्याची माहिती आहे. यावरून परिक्षार्थ्यांनी या विशेष रेल्वगाड्यांकडे पाठ करून खासगी गाड्यांचा आधार घेतल्याचे स्पष्ट होत आहे. एकंदरित या विशेष गाड्यांमधून मध्य रेल्वेला अपेक्षित कमाई झाली नसल्याचे चित्र आहे.
अशी झाली कमाई
अकोला ते नागपूर या मेमू गाडीच्या ६४ अनारक्षित तिकिटांची विक्री झाली. याद्वारे अकोला स्थानकाला फक्त ६ हजार रुपये मिळाले. अकोल्याहून मुंबईला गेलेल्या ११५ परीक्षार्थ्यांनी आरक्षित तिकीट खरेदी केले. यामधून रेल्वेच्या तिजोरीत जवळपास ४३ हजारांची भर पडली. अकोल्याहून नागपूरला गेलेल्या ५६ परीक्षार्थ्यांनी आरक्षित तिकीट घेतले. याद्वारे अकोला स्थानकाला ११ हजार रुपये मिळाल्याची माहिती आहे.
ऐनवेळी मिळाली माहिती
६ सप्टेंबर रोजीच्या परीक्षांसाठी विशेष गाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आली. त्यामुळे अनेकांपर्यंत ही माहिती पोहोचलीच नाही. शिवाय अनारक्षित तिकिटांची विक्रीही ४ सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली. त्यामुळे अनेकांनी तिकीट खरेदीत स्वारस्य दाखविले नाही.