अकोला : पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या विकासाचा समतोल साधण्यासाठी उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाप्रमाणे विदर्भ विकास मंडळाच्या अधीन अमरावती व नागपूर विभागासाठी प्रत्येकी एक उपसमिती स्थापन करण्याची मागणी विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय त्रिंबकराव खडक्कार यांनी केली आहे. यासाठी विकास मंडळ आदेश २०११ मध्ये दुरुस्ती करण्याची विनंती त्यांनी एका पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे.राज्याची विभागणी उर्वरित महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा अशा तीन विभागात झाली असून, या विभागांसाठी विकास मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ हा सर्वच बाबतीत मागास असल्याची वस्तुस्थिती आहे. आता विदर्भातही अमरावती विभाग (पश्चिम विदर्भ) आणि नागपूर विभागात (पूर्व विदर्भ) विकासाचा असमतोल दिसून येत आहे. सिंचन, पाण्याची उपलब्धता, दरडोई उत्पन्न, रस्ते, उद्योग, शैक्षणिक संस्था, विजेची दरडोई खपत या सर्वच बाबतीत पश्चिम विदर्भ हा पूर्व विदर्भाच्या तुलनेत बराच पीछाडीवर आहे. अनुकूल परिस्थितीमुळे पूर्व विदर्भातील जिल्हे हे वेगाने विकास करीत असल्याची भावना पश्चिम विदर्भातील लोकांच्या मनात आहे. विदर्भाचा विकास साधण्यासाठी विदर्भ विकास मंडळ कार्यरत असले, तरी मंडळाकडूनही पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भावर अन्याय होत असल्याचे चित्र आहे.विदर्भातील या दोन विभागांमध्ये वाढत चाललेला विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी या विभागांमधील विकासाचे मुद्दे जोरकसपणे मांडण्यासाठी विदर्भ विकास मंडळाच्या अधीन अमरावती व नागपूर विभागासाठी प्रत्येकी एक अशा दोन स्वतंत्र उपसमित्या असाव्या, अशी मागणी आता जोर धरत आहे.विकास मंडळे आदेश २०११ च्या अनुच्छेद ४(२) व ४ (३) अन्वये उर्वरित महाराष्ट्रासाठी उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळासोबतच प्रत्येक विभागासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक-उपसमिती असावी, अशी तरतूद आहे. त्यानुसार या विभागांमध्ये उपसमित्या कार्यरत असून, या समित्या त्या-त्या विभागातील विकासाच्या मुद्यांवर लक्ष ठेवतात. याच धर्तीवर अमरावती व नागपूर विभागासाठी उपसमित्या स्थापन करण्यासाठी आदेशात दुरुस्ती करण्याची मागणी डॉ. खडक्कार यांनी केली आहे.
विदर्भ प्रदेशातील दोन महसूल विभागातील विकासातील असमतोल या उपसमितीच्या स्थापनेनंतर निश्चितपणे समोर येईल. तो दूर करण्यासाठी विदर्भ विकास मंडळ, समन्वयाची भूमिका घेऊन प्रयत्न करू शकेल.- डॉ. संजय त्रिंबकराव खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ विकास मंडळ, अकोला.