दंडात्मक कारवाइला खाे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:17 AM2021-03-07T04:17:57+5:302021-03-07T04:17:57+5:30
बाजारपेठेत उसळली गर्दी अकाेला: जिल्हा प्रशासनाने दुकाने खुली करण्यासाठी व्यापाऱ्यांना काेराेना चाचणी बंधनकारक केली आहे. काेराेना चाचणी केलेल्या व्यापाऱ्यांनी ...
बाजारपेठेत उसळली गर्दी
अकाेला: जिल्हा प्रशासनाने दुकाने खुली करण्यासाठी व्यापाऱ्यांना काेराेना चाचणी बंधनकारक केली आहे. काेराेना चाचणी केलेल्या व्यापाऱ्यांनी दुकाने उघडताच, खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र गांधी राेड, माेहम्मद अली राेड, जुना भाजी बाजार, काेठडी बाजार, दाना बाजार व टिळक राेड परिसरात दिसून आले. यावेळी नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र हाेते.
लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा!
अकाेला : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ६० वर्षांवरील वयाेवृद्ध नागरिक व गंभीर स्वरूपाच्या व्याधी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांसाठी लसीकरण माेहीम राबविली जात आहे. या लसीकरण माेहिमेसाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन शनिवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ.रणधीर सावरकर, ज्येष्ठ आ.गाेवर्धन शर्मा यांनी केले आहे.
चाचणी करताना नियम पाळा!
अकाेला : शहरात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी चाचणीसाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. रांगेत उभे राहताना नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनपाकडून केले जात आहे.
उन्हाची तीव्रता वाढली!
अकाेला : शहरात मागील चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे लहान मुले, वयाेवृद्ध नागरिकांना साथ राेगांचा धाेका निर्माण झाला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक दुपट्टा, रुमालाचा वापर करीत असल्याचे दिसत आहे.
‘पाणीपुरवठा सुरळीत करा!’
अकाेला: जुने शहरातील शिवनगरमधील जलकुंभातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. असे असले, तरी जुने शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची परिस्थिती आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी डाबकी राेडवासीयांनी केली आहे.
महापाैरांनी घेतला काेविडचा आढावा
अकाेला : शहरात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. त्या पृष्ठभूमीवर महापाैर अर्चना मसने यांनी शुक्रवारी मनपा प्रशासनाचा आढावा घेतला. बैठकीला प्रभारी आयुक्त डाॅ.पंकज जावळे, माजी महापाैर विजय अग्रवाल यांसह वैद्यकीय आराेग्य यंत्रणेतील अधिकारी उपस्थित हाेते.
चाचणी केंद्रांत वाढ करा!
अकाेला : जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना दुकाने खुली करण्यासाठी काेराेना चाचणी बंधनकारक केली आहे. चाचणीसाठी व्यापारी, कामगार व नागरिकांनी पुढाकार घेतला असता, चाचणी केंद्रांवर गर्दी उसळली आहे. ही बाब पाहता, महापालिकेने चाचणी केंद्रांत वाढ करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. केंद्र वाढविल्यास गर्दी टाळता येईल.
चाचणीसाठी नगरसेवकांचा पुढाकार
अकाेला : मागील काही दिवसांत काेराेनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहून, काही नगरसेवकांनी नागरिकांना चाचणी करण्याचे आवाहन केले, तसेच चाचणीसाठी मनपाच्या मदतीने केंद्र उघडले. नगरसेवकांच्या पुढाकारामुळे नागरिकांना सुविधा मिळत असल्याचे दिसत आहे.