अकोला : आधुनिक जगात झपाट्याने वाढलेले औद्योगिकीकरण, वाहनांची प्रचंड संख्या व कार्बन उत्सर्जनामुळे वातावरणातील प्रदूषण प्रचंड वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होत आहे. हवेत आढळणाºया धूर, प्लास्टिक व इतर वस्तूंचे सूक्ष्म कण व प्रदुषणामुळे दमा व श्वसन विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परिणामी जगात सर्वाधिक मनुष्यहानी करणाºया आजारांमध्ये श्वसन विकार दुसºया क्रमांकावर आहे. त्यामुळे नियमीत व्यायाम आणि बचावात्मक उपाययोजना हाच यावरील प्रभावी उपचार ठरू शकतो, असे फुफ्फुस व श्वसन विकार तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध भांबरकर यांनी जागतिक अस्थमा दिनानिमित्त ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने सांगितले.
दमा हा आजार कशामुळे होतो?
वातावरणातील धूळ, धूर, प्लास्टिक, सल्फेट नायट्रेड, कार्बन मोनॉक्साइड, ब्लॅक कार्बन यांचे २.५ मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे कण श्वासोच्छवासाद्वारे श्वसननलिकेत प्रवेश करतात व आतील नाजूक त्वचेला इजा पोहोचवतात. यामुळे श्वसन नलिका लालसर व संवेदनशील होते. वारंवार हा प्रकार सुरू राहिल्यास श्वसन नलिका अरुंद होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
‘दमा’ हा आजार कोणाला होऊ शकतो?
दमा हा आजार प्रदुषित हवा, धूळ आणि धूरीच्या कणांमुळे होतो. त्यामुळे जी व्यक्ती अशा वातावरणाच्या संपर्कात येतो त्यांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. हा आजार कुठल्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. त्यामुळे बचावात्मक उपाय योजना करणेच हितकारक ठरेल.
श्वसन विकाराचे लक्षणं कोणते?
जुना खोकला, कफ पडणे, अस्थमा, छाती खरखर करणे, श्वसन नलिका संकुचित होणे, कोरडी ढास लागणे आदी श्वसन विकाराचे प्रकार आहेत. या पैकी कुठल्याही विकाराचे लक्षण आढळल्यास वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दमा बरा होऊ शकतो का ?
नक्कीच, दमा हा आजार बरा होऊ शकतो. अनेकांमध्ये दमा व या आजाराशी निघडीत लक्षणांमुळे भीती दिसून येते. परंतु, या आजारावर प्रभावी औषधोपचार आहे. या सोबतच नियमीत व्यायाम, योगा आणि प्राणायम केल्यास आजारावर लवकर नियंत्रण मिळवता येते.
बचावात्मक उपाययोजना कशा कराव्यात?
वर्दळीच्या मार्गातून प्रवास टाळावा. मास्कचा वापर करावा. ग्रीन झोनमध्ये वास्तव्यास प्राधान्य द्यावे. प्लास्टीक, रबर तसेच कचरा जाळणे टाळावे. रस्त्यावरील धूळ, वाहनांचा धूर यापासून दूर राहावे. घरामध्ये स्वच्छता राखावी. या प्रमाणे परिस्थितीनुसार बचावात्मक उपाय योजना कराव्यात.