प्राणघातक हल्ल्यातील आरोपीस आठ वर्षांचा सश्रम कारावास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:09 AM2020-03-20T11:09:28+5:302020-03-20T11:09:34+5:30
आठ वर्षांचा सश्रम कारावास तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
अकोला : बाळापूर तालुक्यातील कोळासा येथील रहिवासी दीपक सोनोने याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी गुरुवारी आरोपीला तिसरे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने आरोपीला आठ वर्षांचा सश्रम कारावास तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायालयीन सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारकर्ता दीपक महादेव सोनाने व इतर आरोपी मनोहर देवराव वानखडे याच्या घरी जुगार खेळत होते. मनोहर वानखडे जुगारात हारल्याने त्याचा दीपक सोनोने याच्याशी वाद झाला. या वादातूनच दीपक याला शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच पोटात गुप्ती मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दीपक सोनोने याच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भादंवि कलम ३०७,३२६,५०४,५०६ नुसार गुन्हे दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. याप्रकरणी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर दोषी मनोहर देवराव वानखडे याला ८ वर्षे सश्रम कारावास, पाच हजाराचा दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अॅड. श्याम खोटरे यांनी, तर पैरवी अधिकारी म्हणून ए.एस.आय. अशोक मिश्रा यांनी काम पाहिले.