निवडणूक आटोपली; पण मिळाली नाही दुष्काळी मदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 02:51 PM2019-06-01T14:51:15+5:302019-06-01T14:53:59+5:30
लोकसभा निवडणूक आटोपली असून, खरीप हंगाम तोंडावर आला; परंतु चौथ्या टप्प्यातील दुष्काळी मदत अद्याप मिळाली नाही.
- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत तीन टप्प्यांत प्राप्त झालेली १३७ कोटी ६१ लाख २४ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली; मात्र उर्वरित चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ३९ लाख रुपयांचा मदतनिधी अद्याप शासनामार्फत प्राप्त झाला नाही. लोकसभा निवडणूक आटोपली असून, खरीप हंगाम तोंडावर आला; परंतु चौथ्या टप्प्यातील दुष्काळी मदत अद्याप मिळाली नाही. त्यामुळे प्रलंबित मदतीची रक्कम बँक खात्यात केव्हा जमा होणार, याबाबत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त २ लाख १२ हजार शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्फत मंजूर करण्यात आलेल्या एकूण १९९ कोटी रुपयांच्या दुष्काळी मदतनिधीपैकी शासनामार्फत तीन टप्प्यांत १३७ कोटी ६१ लाख २४ हजार ५६० रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत फेबु्रवारीमध्ये जिल्ह्यातील संबंधित पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांकडून मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात आली. बँकांमार्फत मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त बँक खात्यात जमा करण्यात आली; परंतु उर्वरित चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ३९ लाख रुपयांची मदत अद्याप शासनाकडून प्राप्त झाली नाही. लोकसभा निवडणूक आटोपली असून, खरीप हंगाम तोंडावर आला; मात्र मदत मिळाली नसल्याने, दुष्काळी मदत खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत दुष्काळग्रस्त शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
६१ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे; पालकसचिवांकडेही मागणी!
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी मंजूर मदतनिधीपैकी चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ३९ लाख रुपयांच्या मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दोन महिन्यांपूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला आहे. प्रलंबित दुष्काळी मदतीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्ह्याच्या पालकसचिवांकडेही १० दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.
खरीप पेरणीपूर्वी मदत खात्यात जमा होणार?
दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. येत्या खरीप हंगामातील पेरणीसाठी बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील दुष्काळी मदतीची रक्कम खरीप पेरणीपूर्वी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अकोट-पातूर तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना मदत केव्हा?
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पहिल्या यादीत शासनामार्फत जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी तीन टप्प्यांत मदतनिधीही वितरित करण्यात आला. त्यानंतर दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या दुसºया टप्प्यातील यादीत जिल्ह्यातील अकोट व पातूर या दोन तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला; मात्र दोन्ही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी अद्याप मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबत दोन्ही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांच्या मदतीसाठी शासनाकडून तीन टप्प्यांत प्राप्त झालेली १३७ कोटी ६१ लाख रुपयांची मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आली असून, उर्वरित चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ३९ लाख रुपये मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या पालकसचिवांकडेही निधीची मागणी करण्यात आली आहे.
- राम लठाड,
निवासी उपजिल्हाधिकारी.