जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकली तातडीच्या रस्ते दुरुस्तीची कामे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:21 AM2021-08-23T04:21:45+5:302021-08-23T04:21:45+5:30

संतोष येलकर अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची वाट लागली असून, नुकसान झालेल्या रस्त्यांची तातडीने ...

Emergency road repair works stuck in Zilla Parishad's affairs! | जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकली तातडीच्या रस्ते दुरुस्तीची कामे !

जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकली तातडीच्या रस्ते दुरुस्तीची कामे !

Next

संतोष येलकर

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची वाट लागली असून, नुकसान झालेल्या रस्त्यांची तातडीने करावयाच्या दुरुस्तीची कामे मात्र अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकलेली जिल्ह्यातील तातडीच्या रस्ते दुरुस्तीची कामे मार्गी लागणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बरसल्याने नदी व नाल्यांना पूर आला होता. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी रस्ते, पूल आणि रपटे वाहून गेले. रस्ते वाहून गेल्याने काही गावांचा संपर्कदेखील तुटला होता. रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी रस्त्यांची वाट लागली असून, रस्ते समस्यांचा सामना ग्रामस्थांना सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तातडीच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु पूर ओसरल्यानंतर महिना उलटून जात असला तरी, जिल्ह्यातील ग्रामीण भागात तातडीच्या रस्ते दुरुस्ती कामांना अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकलेली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तातडीच्या रस्ते दुरुस्तीची कामे मार्गी लागणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी

७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध!

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात नुकसान झालेल्या रस्ते, पूल व रपट्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु उपलब्ध निधीतून तातडीच्या रस्ते दुरुस्तीची कामे मात्र अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे.

अंदाजपत्रके तयार; पण

निविदा प्रक्रिया बाकी!

जिल्ह्यातील ग्रामीण भागात तातडीने करावयाच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत कामांची अंदाजपत्रके तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परंतु १५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी निविदाप्रक्रिया पूर्ण होणे अद्याप बाकी आहे. निविदा मागविण्यासह कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याने, तातडीच्या रस्ते दुरुस्तीची कामे केव्हा सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या ग्रामीण भागातील तातडीच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी ‘डीपीसी’कडून निधी उपलब्ध झाला असून, कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली आहेत. १५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी लवकरच निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

एन. जी. अघम

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद

Web Title: Emergency road repair works stuck in Zilla Parishad's affairs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.