अकोला : रेल्वे माल वाहतूक वाढविण्याकरिता रेल्वे बोर्डाने दिलेल्या दिशा निर्देशानुसार नांदेड रेल्वे विभागात बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट गठित करण्यात आले आहे. नांदेड रेल्वे विभागातील हे बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट (बीडीयू) कांदा, मका, साखर, सरकी यासारखी पारंपरिक रेल्वे माल वाहतूक वाढविण्याबरोबरच अपारंपरिक माल वाहतूक तसेच छोटी माल वाहतूक वाढविण्याकरिता कार्य करेल.नांदेड विभागाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक श्री ए. श्रीधर हे या कार्य समितीचे संयोजक असतील. त्यांच्या सोबत या समितीचे सदस्य म्हणून वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक पी. दिवाकर बाबू, वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक उदयनाथ कोटला, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता शेख मोहमद अनिस हे काम पाहतील.या समितीचे मुख्य कार्य म्हणजे माल वाहतूक वाढविण्याकरिता व्यापारी आणि उद्योजक यांच्याशी वारंवार चर्चा करणे आणि नवीन संभावित ग्राहकांशी सल्लामसलत करणे हे राहणार आहे. संभावित ग्राहकांनी दिलेल्या विविध सूचना/ सल्ल्याचे विश्लेषण करून त्याची व्यवहार्यता तपासून योग्य तो धोरणात्मक हस्तक्षेप करून अपारंपरिक / छोटी-मोठी माल वाहतूक सुरू करण्याबरोबरच पारंपरिक माल वाहतूक अधिकाधिक वाढविणे आदी कार्यही हे युनिट करणार आहे.