रोजगार बंद पडला; गरिबाच्या झोपडीत नव्हतं सांजीचं दळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 03:01 PM2020-04-24T15:01:39+5:302020-04-24T15:01:59+5:30
स्वाभिमानी पती-पत्नीवर तान्ह्या मुलाला घेऊन भरउन्हात कूलरचे गवत विकण्याची वेळ आली आहे.
- नितीन गव्हाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पती-पत्नी आणि दोन वर्षांचा चिमुकला मुलगा, असा संसार. पती बॅन्ड पथकात वाद्य वाजवून पैसे कमवायचा. घराचा उदरनिर्वाह चालायचा; परंतु कोरोनामुळे लग्नसराई बंद झाली. बॅन्ड पथक बंद पडले. रोजगार बंद पडला. त्यामुळे खायचे काय, असा या कुटुंबासमोर प्रश्न उभा राहिला. बॅन्ड पथकाचे काम बंद असल्यामुळे या स्वाभिमानी पती-पत्नीवर तान्ह्या मुलाला घेऊन भरउन्हात कूलरचे गवत विकण्याची वेळ आली आहे. साडीचा पाळणा करून त्यात तान्ह्या मुलाला निजवत ही माउली संकटात संसाराचा गाडा रेटण्याचा प्रयत्न करत आहे.
एक कवी आईचं दु:ख मांडताना म्हणतो,
रडू नका रे मुलांनो गेले रे जोंधळ्याले...मायेच्या कुशीमंधी पोरं उपाशी निजले...
काळजाच्या या घराची, झाली उपाशी घळण...गरिबाच्या झोपडीत नव्हतं सांजीचं दळण...
अशीच परिस्थिती मोलमजुरी करणाºया या गरीब कुटुंबांची झाली आहे. डॉ. आंबेडकर नगरात राहणारे श्यामराव तायडे हे एका बॅन्ड पथकात काम करतात. घरी पत्नी पूजा आणि दोन वर्षांचा मुलगा राज. राजा-राणीचा त्यांचा संसार. बॅन्ड पथकात वाद्य वाजवून श्यामराव महिन्याकाठी ८ ते १0 हजार रुपये कमवायचे; परंतु अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. संचारबंदी लागू झाली. नियोजित लग्नसमारंभही रद्द झाले.
लग्नसराईच नाही, तर वाद्य वाजवायचे कुठे, असा प्रश्न उभा राहिला. रोजगारच उरला नाही, तर आता खायचे काय, अशा अनेक प्रश्नांचे काहूर श्यामराव तायडे यांच्या मनात सुरू झाले. गाठीचा असलेला पैसा संपला. आता पुढे काय, यातून मार्ग कसा काढायचा, पत्नी पूजा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली. तिने धीर दिला. संसार चालविण्यासाठी... उदरनिर्वाह भागविण्यासाठी दोघा पती-पत्नीने तान्ह्या मुलाला घेऊन सिव्हिल लाइन चौकात कूलरचे गवत विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
दिवसभर उन्हातान्हात राबून १00-१५0 रुपये मिळतात. त्यातही पोलीसवाले हाकलून देतात. गवत जप्त करतात. तरीही हे दाम्पत्य पोटापाण्यासाठी दिवसभर राबून फाटलेल्या संसाराला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोना संकटाशी दोन हात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हेही दिवस निघून जातील. या विश्वासावर हे तिघे स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न
बॅन्ड पथकाचे काम बंद असल्यामुळे कूलरचे गवत विकून स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न पूजा व श्याम तायडे करीत आहेत. दिवसभर काम केले नाही, तर खावं काय, त्यात पोलीस कर्मचारी तेथे येऊन त्यांना हुसकावून लावतात. गवत फेकून देतात. करावे काय, सुचत नाही. प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे, स्वाभिमानाने जगण्यास मदत करावी, अशी अपेक्षा या दाम्पत्याने व्यक्त केली.
बॅन्ड पथकाचे काम बंद झाल्याने, पतीवर बेकारीची वेळ आली. संसार चालविण्यासाठी पैसा लागतोच. त्यासाठी मी चिमुकल्या मुलाला घेऊन पतीसोबत कूलरचे गवत विकून संसार सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
-पूजा श्याम तायडे, गृहिणी.