सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:35 PM2019-06-03T12:35:57+5:302019-06-03T12:36:00+5:30
स्त्यालगत नव्हे, तर चक्क रस्त्यावरच अनधिकृतपणे पेव्हर ब्लॉक व त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुप्पी साधली आहे.
अकोला: सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवरील मुख्य चौकात एका कमर्शियल कॉम्प्लेक्सच्यावतीने उभारण्यात आलेले अतिक्रमण अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. रस्त्यालगत नव्हे, तर चक्क रस्त्यावरच अनधिकृतपणे पेव्हर ब्लॉक व त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुप्पी साधली आहे. थेट मुख्य रस्त्यावर उभारलेल्या अतिक्रमणाकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने कोणाचे खिसे जड झाले, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.
शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून गांधी रोडकडे पाहिल्या जाते. सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून ते रेडीमेड कपड्यांसह विविध वस्तूंची या परिसरात बाजारपेठ आहे. शहरातील खवय्यांची गांधी चौकातील चौपाटीवर चांगलीच गर्दी राहते. गर्दीमुळे अकोलेकरांना गांधी रोडवरून चालताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते. गांधी रोड परिसरातील वाढत्या अतिक्रमणामुळे अकोलेकरांच्या समस्येत भर पडली आहे. गांधी चौकातील अतिक्रमकांकडे महापालिका प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्यामुळेच अतिक्रमकांच्या दादागिरीने उचल खाल्ली आहे. गांधी चौकातील एका कमर्शियल कॉम्प्लेक्सच्यावतीने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली चक्क रस्त्यावरच पेव्हर ब्लॉक उभारून त्याला लाखेंडी ग्रील लावली आहे. पेव्हर ब्लॉक बसविताना मनपाचे सर्व निकष नियम पायदळी तुडवत गांधी चौकातील थेट मुख्य रस्त्याचा वापर करण्यात आला आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना लघू व्यावसायिक त्यांच्या हातगाड्या लावून व्यवसाय करीत असल्यामुळे मुख्य रस्त्यावरून चालावे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.
करारनामा पायदळी; मनपाची चुप्पी
गांधी चौकातील एका कमर्शियल कॉम्प्लेक्सच्यावतीने दुकानांना सुरक्षा व्हावी, म्हणून चक्क रस्त्यावर पेव्हर ब्लॉक उभारून त्याला लोखंडी ग्रिल लावण्यात आले. या अनधिकृत कामासाठी चक्क नियमांचा वापर करून गांधी चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मनपासोबत करारनामा करण्यात आला. रस्त्यालगतच्या गोरगरीब लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांची वाहने जेसीबीखाली चिरडणाऱ्या महापालिकेला सदर अतिक्रमण दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पार्किंगच्या जागेवर व्यवसाय कसा?
गांधी चौकातील दुर्गा देवीच्या मंदिरासमोरील जागा पार्किंगसाठी राखीव आहे. या ठिकाणी पार्किंग स्टॅन्ड निर्माण करण्यात आले असले तरी सदर जागेवर अतिक्रमकांनी व्यवसाय उभारल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना त्यांची वाहने ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने कुचंबणा होत आहे.
करारनामा रद्द का नाही?
गांधी चौकात उभारण्यात आलेल्या सौंदर्यीकरणाचा करार नगररचना विभागासोबत करण्यात आला आहे. या सौंदर्यीकरणामुळे गांधी चौकात अतिक्रमणाची समस्या निर्माण झाली असून, वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. ही समस्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने हा करारनामा रद्द करून उभारण्यात आलेले अतिक्रमण तातडीने काढावे, अशी मागणी अकोलेकर करीत आहेत.