सोनाळा येथील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 06:03 PM2020-03-05T18:03:06+5:302020-03-05T18:03:14+5:30
ग्राम पंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ४ मार्च रोजी सायंकाळी हटविले.
किन्हीराजा (वाशिम) : येथुन जवळच असलेल्या सोनाळा येथील हनुमान मंदिर परिसरात असलेले अतिक्रमण स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ४ मार्च रोजी सायंकाळी हटविले.
सोनाळा येथील हनुमान मंदिर परिसरात काही जणांनी अतिक्रमण केले होते. या ठिकाणी खासदार निधीमधून सामाजिक सभागृह मंजूर झाले असून त्यासाठी निधीही मिळाला आहे. परंतू, नियोजित जागेवर अतिक्रमण असल्याने सभागृहाचे बांधकाम करण्यात अडथळा निर्माण झाला. सदर अतिक्रमण काढून घ्यावे यासंदर्भात ग्रामपंचायतने संबंधितांना वारंवार सूचना केल्या. परंतू अतिक्रमण काढले नाही. शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्त मागवून अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला. जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनकडून ४ मार्च रोजी पोलीस बंदोबस्त मिळाल्याने महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायतने संयुक्तरित्या अतिक्रमण हटविले. यावेळी अतिक्रमितांना घरावरील पत्रे, दरवाजे, लाकडी साहित्य व घरातील सर्व साहित्य पंचासमक्ष ताब्यात देण्यात आले. अतिक्रमण काढताना कोणताही अडथळा आला नाही. यावेळी यावेळी नायब तहसिलदार वाय .आर.हातेकर, विस्तार अधिकारी पी.डी. लोखंडे, मंडळ अधिकारी पी.एम. पांडे, तलाठी व्हि.बी. गवळी, ग्रा.पं सचिव बी.एस. हेंबाडे, पोलीस उपनिरिक्षक राजेश पंडित, सरपंच राहुल वानखेडे यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी, कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.