अकाेला : राज्यात ‘ब्रेक दी चेन’ मोहिमेंतर्गत ५ एप्रिलपासून नवी नियमावली लागू करण्यात आली. त्यानुसार हा एकप्रकारचा मिनी लॉकडाऊनच असून, पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी जमण्यावर निर्बंध आहेत. त्याचा अनेक ठिकाणी कोविड लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला, मात्र, जिल्ह्यात लाभार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे पाच ते सहा हजार लाभार्थी कोविड लस घेत आहेत.
राज्य शासनाने लावलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बाजारपेठ बंद असल्याने बाजारपेठेतील गर्दी कमी झाली. हीच स्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये असून त्याचा परिणाम कोविड लसीकरण मोहिमेवर झाला. अकोल्यात मात्र याउलट परिस्थिती असून, मागील दोन दिवसांत लस घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लॉकडाऊनचा लसीकरण मोहिमेवर कुठलाच परिणाम दिसून आला नाही, मात्र, लसीकरण केंद्रांवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची गरज असल्याचे निदर्शनास येत आहे.
मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेले लसीकरण
२७ मार्च - २४९७
२८ मार्च - ४३
२९ मार्च - ००
३० मार्च - २१०५
३१ मार्च - ३१४०
१ एप्रिल - ४१३३
२ एप्रिल - ३४७५
३ एप्रिल - ५७४८
४ एप्रिल - २८८८
५ एप्रिल - ५८३०
६ एप्रिल - ६५२०
आतापर्यंत जिल्ह्यात झालेले लसीकरण
हेल्थकेअर वर्कर - १०४१२ , ४४९४
फ्रंटलाईन वर्कर - ९४३९,४६५९
४५ वयापेक्षा जास्त - ८३,२४९
मी कोविड लस घेतली. कोविड लसीकरण केंद्रावर सर्व सुरळीत असून, कोणापासून कोरोनाची लागण होणार, अशी भितीही वाटली नाही. लसीकरण सुरक्षित आहे, तुम्ही देखील घ्या.
- विमल जयस्वाल, लाभार्थी
नियमांचे पालन केल्याने कोविड लसीकरण केंद्रावर सहज जाणे शक्य झाले. लसीकरण सुरक्षितरित्या झाले. ज्यांनी लस घेतली नाही, अशांनी देखील लस घ्यावी.
- ज्ञानेश्वर इढोळ, लाभार्थी
जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोविड लसीकरणावर परिणाम झाला नाही. उलट गत दोन दिवसांत कोविड लसीकरण वाढले. नागरिकांनी नियमांचे पालन करून लस घेण्यासाठी घरून निघावे. लसीकरण सुरक्षित आहे, मात्र नियमांचे पालन आवश्यक आहे.
- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम,अकोला