अकाेला : केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या निकषानुसार इंधनाप्रमाणे वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार आहेत. हे निर्देश नुकतेच दिले असले तरी आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत काहीच माहिती नाही. वरिष्ठ अधिकारी, ड्रायव्हिंग स्कूल संचालक तसेच वाहनचालक अनभिज्ञ असल्याचे त्यांना विचारलेल्या माहितीवरून समाेर आले आहे.
केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने निकष जारी केले आहेत. मात्र, त्याचे परिपत्रक अद्याप देशातील व राज्यातील आरटीओंना न मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे याबाबत जिथे अधिकाऱ्यांनाच माहिती नाही तिथे सामान्य वाहन चालकांना काय माहित असणार. तर दिल्ली खूप दूर आहे. या बदलाबद्दल चाचपणी केली असता या नवीन नियमाबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे केंद्राने हा बदल का केला आहे, त्याचे महत्त्व काय, त्यातून काय साध्य होणार, हे सगळे प्रश्न अनुत्तरित असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अकाेला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीत ५ लाख ८४ हजार ९६१ विविध इंधन वाहनांची नोंद असली तरीही केंद्राच्या निकषानुसार हिरवा, निळा, नारिंगी या बदलांबाबत जनजागृती नसल्याने हे बदल कधी अमलात येतील, हे आताच सांगणे कठीण आहे. त्यातही पेट्रोलसाठी निळे, डिझेलसाठी नारिंगी असे स्टिकर लावण्यात येणार असल्याबाबतही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
--------------
जिल्ह्यातील एकूण वाहने - ५ लाख ८४ हजार ८६१
पेट्रोलवर चालणारी वाहने - १ लाख ८९ हजार ६८५
डिझेलवर चालणारी वाहने - ३ लाख ९१ हजार १०१
सीएनजी वाहने -३१७
इलेक्ट्रिक वाहने -९५८
-------------------
स्टिकर कुठे मिळणार?
केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या निकषानुसार इंधनाप्रमाणे वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार आहेत. त्यात पेट्रोल व सीएनजी वाहनांसाठी फिक्का निळा, इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहनांसाठी हिरवा, तर डिझेल वाहनांसाठी नारिंगी रंगाचे स्टिकर लावण्याचे निर्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या संकल्पनेबाबत अद्याप तरी अकाेला आरटीओ अनभिज्ञ असल्याने असे स्टिकर मिळणार तरी कोठे, या प्रश्नाचे उत्त्तरही मिळू शकले नाही.
-----
स्टिकर न लावल्यास
केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या निकषानुसार इंधनाप्रमाणे वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अकाेला जिल्ह्यात खुद्द आरटीओ कार्यालयच या संकल्पनेबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे वाहनधारकांनी इंधनानुसार स्टिकर लावले नाहीत, तरी त्यांच्यावर कारवाई होण्याचा प्रश्नच येथे उद्भवत नाही.
---------------
अकाेला आरटीओ हद्दीतील एकूण इंधन प्रकारानुसार वाहनांची नोंद केली आहे. मात्र, इंधनानुसार वाहनांना वेगवेगळे स्टिकर लावण्यासंदर्भात आताच सांगता येणार नाही. कोविड काळात राज्य शासनाने पोलिसांच्या मदतीने अत्यावश्यक वाहनांसह विशेष सूट दिलेल्या रंगसंगतीच्या स्टिकरसंदर्भात माहिती होती. आता केंद्राचे निकष असतील तर ते आमच्यापर्यंत आल्यावर त्याचीही तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल.
-ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकाेला