कोरोनाने मृत्यू झाल्यास महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाखांचे सानुग्रह अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:53 AM2020-06-22T11:53:29+5:302020-06-22T11:54:03+5:30
कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभागाने गांभीर्य राखून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अकोला : राज्यातील सुमारे २ कोटी ६० हजार ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व दर्जेदार सेवा देण्यासाठी कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावात अविश्रांत कार्यरत असणाºया महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
महावितरणमध्ये संचालन व दुरुस्तीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाºयांना (बाह्यस्रोत) तसेच महावितरणच्या विविध कार्यालयात कार्यरत असणाºया सुरक्षा रक्षक यांनादेखील ३० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला असल्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
कोरोनाच्या सार्वत्रिक प्रादुर्भामध्ये महावितरणचे अभियंते, कर्मचारी व बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. राज्य प्रशासन कोरोनाचा पराभव करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असताना राज्यातील सामान्यांना घरातच थांबणे आवश्यक आहे. अशा घरात राहणाºया व घरूनच कामे करणाºयांना महावितरणने २४ तास अखंडित वीज पुरवठा देऊन मोठा दिलासा दिला आहे. यादृष्टीने महावितरणचे कर्मचारीदेखील हे कोरोना योद्धे ठरले आहेत. कर्मचाºयांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभागाने गांभीर्य राखून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महावितरणचे तांत्रिक तसेच अतांत्रिक प्रवर्गात कार्यरत असणारे सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाºयांना हे सानुग्रह अनुदान लागू राहणार आहे. कर्मचाºयांचा मृत्यू हा कोविड-१९ विषाणूने झाला असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र हे शासकीय/पालिका/महानगरपालिका/आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये/प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेले असावे. हे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.