अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउन कालावधीत जिल्ह्यातील ५ ते ६ हजार लर्निंग लायसन्सधारकांची वैधता मुदत संपुष्टात आल्याने अनेकांची चिंता वाढली. त्यातच संचारबंदी तसेच फिजिकल डिस्टन्सिंगनुसार कार्यालयातील उपस्थितीवर मर्यादा आल्याने ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचे कामही थांबले. या समस्येवर उपाय करण्यासाठी आता परिवहन विभागाने लर्निंग लायसन्सची वैधता ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आता सर्व लर्निंग लायसन्सधारकांना त्या पुढील तारीख देत पुढील वैधता निश्चित केली जाणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे मोटार वाहन अधिनियम १९८८ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत संबंधित विविध कागदपत्रांच्या वैधतेबाबत केंद्र शासनाने राज्याला निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, त्यामध्ये लर्निंग लायसन (शिकाऊ अनुज्ञप्ती) बाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे याबाबतचा निर्णय राज्याच्या परिवहन आयुक्तांनाच घ्यावा लागला. दरम्यान, राज्यातील सर्वच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून लर्निग लायसन्स प्राप्त केलेल्या उमेदवारांना लायसन्सची मुदत संपल्याने ठरलेल्या तारखेवर उपस्थित राहून त्यांची पुढील वैद्यकीय आणि इतर चाचण्या होतात की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. सप्टेंबर २०१९ पासून लर्निंग लायसन्स प्राप्त केलेल्या उमेदवारांना मार्च २०२० पासून पुढे नंतरची तपासणीची तारीख देण्यात आली. त्याच वेळी २१ मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले. त्यामध्ये संपूर्ण कामकाज बंद झाले. या परिस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात किमान ५ हजारांपेक्षाही अधिक उमेदवारांना पुन्हा चाचणी देण्याची वेळ येते की काय, ही धास्ती वाढली. त्यावर परिवहन आयुक्तांनी १७ मे रोजी पत्र देत लर्निंग लायसन्सची वैधता ३० जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात वैधता संपुष्टात येणाऱ्यांना त्यापुढील तारीख देत त्या दिवशी तपासणी केली जाणार आहे.
लर्निंग लायसन्सधारकांना मुदतवाढ मिळाल्याने त्यांना ३० जून नंतरच्या कालावधीत लायसन्स संदर्भातील कार्यवाही करता येईल. तसेच तारीखही निश्चित केल्या जातील.- गोपाल वरोकार, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला.