महाआवास अभियानास मुदतवाढ; घरकुलांची कामे लागणार मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:01 AM2021-03-02T11:01:18+5:302021-03-02T11:01:27+5:30
Extension To Mahavas Abhiyan प्रलंबित घरकुलांची कामे मार्च अखेरपर्यंत मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून भर दिला जात आहे.
अकोला: महाआवास अभियानास शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रलंबित घरकुलांची कामे मार्च अखेरपर्यंत मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून भर दिला जात आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) रखडलेली घरकुलांची कामे मार्गी लावण्यासाठी शासनामार्फत राज्यात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने महाआवास अभियानास येत्या मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याअनुषंगाने मुदतवाढीच्या कालावधीत जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील रखडलेली घरकुलांची कामे मार्गी लावण्याच्या कामावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून भर देण्यात आला आहे. त्यामध्ये घरकुलांचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करणे, घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम उपलब्ध करुन देणे, घरकुलांची अपूर्ण कामे पूर्ण करणे आणि घरकूल बांधकामाचे अनुदान शंभर टक्के वितरीत करणे इत्यादी प्रकारची कामे प्राधान्याने जिल्हा परिषद प्रशासनामार्फत मार्च अखेरपर्यंत करण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरज गोहाड यांनी सांगितले.