व-हाडातील मत्स्य प्रजाती नामशेष
By Admin | Published: July 31, 2015 10:52 PM2015-07-31T22:52:03+5:302015-07-31T22:52:03+5:30
नद्यांमध्ये होत असलेल्या विघातक बदलांचा मत्स्य व्यवसायावर परिनाम.
दादाराव गायकवाड/कारंजा लाड (वाशिम): गोदावरी आणि तापी यासारख्या मोठय़ा नद्यांच्या खोर्यांनी समृद्ध असल्यामुळे कधी काळी मत्स्यविविधतेसाठी वर्हाड प्रसिद्ध होते; परंतु गत काही वर्षांपासून नद्यांमध्ये होत असलेल्या विघातक बदलामुळे या भागातील देशी अर्थात स्थानिक माशांच्या (मत्स्य) प्रजाती नष्ट होत असून, भविष्यात वर्हाडातील मत्स्यसृष्टी संपुष्टात येण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. वाशिम जिल्हय़ातील अभ्यासकांनी मासेमारी व्यवसाय करणार्यांसोबत केलेल्या पाहणीतून हे वास्तव समोर आले आहे. गत काही वर्षांंपूर्वी वर्हाडात भाडर (नोटोप्टेरस), तंबू (अंगुलीया बेंगालेंसीस), वाडीस (टोर खुद्री), पोडशी (टोर मसुल्ला), पालोची (डॅनियो इक्विपिन्नाटस), वारंजा (ओंपॅक बायमाक्युलाटस), बत्तासी (युट्रोपिकथस वाचा) इत्यादी माशांच्या प्रजाती मोठय़ा प्रमाणात आढळायच्या, किंबहुना वर्हाड हा भाग या माशांसाठी प्रसिद्ध होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये; परंतु वर्हाडातील या माशांच्या प्रजाती निकटच्या काळात संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. वर्हाडातील अडाण, बेंबळा इत्यादी नद्यांचे अभ्यासक डॉ. निलेश हेडा यांनी स्थानिक मासेमारांसोबत केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. एकेकाळी वर्हाडातील जवळपास सर्वच भागातील नद्यांमध्ये तंबू हा मासा मोठय़ा प्रमाणावर आढळायचा; परंतु औषधी गुणधर्मांंनी संपन्न असलेला हा मासा गेल्या १0 वर्षांपासून आढळलेलाच नसल्याचे माशांचे नमुने नियमितपणे घेणारे डॉ. निलेश हेडा यांनी सांगितले. यामुळे हजारो वर्षांपासून मासेमारीवर उपजिविका अवलंबून असलेल्या भोई जमातीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.