सोशल मीडियावर बनावट अकाउंट; २७ गुन्हे दाखल, सात दिवसांत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:29+5:302021-07-05T04:13:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : साेशल मीडियाचा वापर माेठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा दुरुपयाेग करणारे गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : साेशल मीडियाचा वापर माेठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा दुरुपयाेग करणारे गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. गत काही वर्षांपासून फेसबुकवर एखाद्याच्या नावाने बनावट अकाउंट तयार करायचे आणि त्याच्या मित्रांना पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहेत. जिल्हाभरात सन २०१९ ते २०२१ च्या जूनपर्यंत २७ गुन्हे दाखल झाले आहेत. काेराेनाच्या काळात अशा तक्रारी वाढल्या आहेत.
तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अनेक जण समाजमाध्यमांचा माेठ्या प्रमाणात वापर करतात. सायबर गुन्हेगार फसवणुकीचे अनेक मार्ग शाेधत असतात. गत काही वर्षांत फेसबुकवर एखाद्याच्या नावाने बनावट अकाउंट काढायचे, त्याच्या मित्रांना पैशांची मागणी करायची, असा नवीन प्रकार सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे, असा प्रकार घडल्यास तातडीने पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. त्यावर सात दिवसांत ते अकाउंट बंद करण्यात येते.
ओटीपी किंवा क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती घेऊन फसवणूक हाेत असल्याची जनजागृती हाेत आहे. त्यामुळे, नागरिक सावध झाल्याने सायबर गुन्हेगार फसवणुकीचे वेगवेगळे मार्ग वापरत आहेत.
तक्रारी वाढल्या!
काेराेनाकाळात फेसबुक अकाउंट हॅक करून किंवा बनावट खाते उघडून पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
फेसबुकवर अनाेळखी मुलींच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सेक्स्टाॅर्शनचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे, नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे.
तक्रारीसाठी स्वतंत्र पाेर्टल
समाज माध्यमावर किंवा ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करण्यासाठी स्वतंत्र पाेर्टल तयार करण्यात आले आहेत.
सर्वांत आधी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी लागते. ही तक्रार संबंधित पाेलीस ठाण्याचे अंमलदार किंवा तपास अधिकारी ते सायबर सेलकडे पाठवतात.
तांत्रिक बाबींचा तपास सायबर सेलकडून करण्यात येताे. सायबर सेलकडून तपास करून आराेपींचा शाेध लावण्यात येताे.
अकोला येथील एका महिलेची फेसबुकवरून बदनामी करणाऱ्यास एका आराेपीस सायबर सेलने पोलिसांच्या मदतीने अटक केली हाेती.
बनावट अकाउंट काढल्याचे आढळल्यास तातडीने पाेलीस स्टेशनला तक्रार करावी. सायबर सेलकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सात दिवसांनी बनावट अकाउंट बंद हाेते.
तुम्हाला बनावट अकाउंट दिसले तर...
फेसबुकवर फेक अकाउंट शाेधा. स्वत:च्या किंवा ज्याच्याकडून समजले त्याच्याकडून त्या प्राेफाइलची लिंक मागवून घ्या.
फेक अकाउंट दिसल्यास त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डाॅटवर क्लीक करा. त्यामध्ये फाइंड सपाेर्ट आणि रिपाेर्ट प्राेफाइलवर क्लिक करा.
प्रिटेंडिंग टू बी समवन वर या पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करून स्वत: रिपाेर्ट करत असाल तर मी सिलेक्ट करा, मित्रासाठी करत असाल तर फ्रेंड सिलेक्ट करा.
पुढे टाइप करण्यासाठी एक बाॅक्स येईल. त्यात मित्राचे नाव टाइप करा व मित्राचे ओरिजनल प्राेफाइल सिलेक्ट करून रिपाेर्ट सबमिट करा. त्यानंतर ते अकाउंट बंद हाेणार.
ही घ्यावी काळजी
फेसबुकवर एकापेक्षा जास्त अकाउंट काढू नये.
आपल्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड १ ते ९ अंक, ए टू झेड आणि स्पेशल कॅरेक्टर वापरून ठेवावा.
फेसबुकच्या अकाउंटच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये फ्रेंडलिस्टची सेंटिंग ओनली फाॅर मी करावी.
अनाेळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये.
साेशल मीडियावरून पैशाची मागणी झाल्यास त्याला दाद देऊ नये.
सायबर सेलकडे दाखल झालेले गुन्हे
२०१९ - ०९
२०२० -११
२०२१ - ०७
सायबर सेलकडे आलेल्या मौखिक तक्रारी
२०१९ - ११८
२०२० - १०२
२०२१ - ७४