अकोटात शेतकऱ्याने केली काळ्या गव्हाची लागवड; फायदे वाचून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 03:25 AM2021-02-11T03:25:22+5:302021-02-11T07:10:58+5:30
राजस्थान, पंजाबसह हरियाणात उत्पादन
अकोला : अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील सुहास तेल्हारकर या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात पहिल्यांदाच काळ्या गव्हाची लागवड केली. हा गहू विविध प्रकारच्या दुर्धर आजारांपासून संरक्षण करणारा असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
देशात राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश आदी राज्यांमध्ये काळ्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील रहिवासी सुहास तेल्हारकर यांच्याकडे जवळपास १५ एकर शेतजमीन आहे. त्यापैकी दोन एकरावर ४० किलो काळ्या गव्हाचे बियाणे पेरले. त्यासाठी लागणारे बियाणे राजस्थानमधून मागविले. तेल्हारकर यांच्यासोबतच मिलिंद झाडे यांनीही काळ्या गव्हाची लागवड केली. दोघांच्याही शेतातील काळ्या गव्हाचे पीक चांगल्या स्थितीत असून, अपेक्षेप्रमाणे उत्पादन निघण्याची आशा आहे.
प्रति एकर २० ते २५ क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. सर्वसाधारण गव्हाच्या तुलनेत काळ्या गव्हाचे बियाणे महाग असले, तरी उर्वरित खर्च कमी आहे.
- सुहास तेल्हारकर, युवा शेतकरी, अकोलखेड, ता. अकोट.
काळ्या गव्हावर मावा, तुडतुडे येत नाहीत.
एका बुंध्याला ९ ते १० ओंब्या येतात.
एकरी ७ ते ८ हजार रुपये खर्च येतो.
आरोग्यविषयक असे आहेत लाभ
कृषी तज्ज्ञांच्या मते, काळा गहू हा रक्तदाब, मधुमेह, रक्तपेशी, कॅन्सर, हृदयरोग आदी आजारांच्या उपचारासाठी गुणकारी आहे.