अकोला : शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चातर्फे अकोल्यातून आंदोलनाचे बिगुल फुंकण्यात येणार असून त्याची सुरुवात २० फेब्रुवारी रोजी किसान कैफियत महापंचायतने होणार आहे. या महापंचायतला शेतकरी नेते राकेश टिकैत आणि युद्धविर सिंह येणार असल्याची माहिती शेतकरी जागर मंचतर्फे शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलन संदर्भात शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी जागर मंचतर्फे माहिती देण्यात आली. अकोल्यात २० फेब्रुवारी रोजी खुले नाट्यगृह येथे आयोजित किसान कैफियत महापंचायतीस खासदार राजू शेट्टी प्रणीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, भैय्यासाहेब देशमुख व विवेक पारसकर यांच्या नेतृत्वातील किसान विकास मंच, कुणबी विकास मंडळ, नेहरू युवा परिवार, आमदार किरण सरनाईक प्रणीत अमरावती विभागीय शिक्षक संघ, मराठा सेवा संघ, देशमुख समाज मंडळ, अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच इतर संघटनांचा आंदोलनात सहभाग असणार असल्याची माहिती शेतकरी जागर मंचातर्फे देण्यात आली. पत्रकार परिषदेला शेतकरी जागर मंचाचे संयोजक प्रशांत गावंडे, कपिल ढोके, आकाश पवार, श्याम मनतकार, अक्षय राऊत, अंकुश गावंडे, सौरव गवई, अमोल इंगोले, पवन मंगळे, प्रतीक सुरवाडे, रेहानभाई, आकाश कवळे, कुणाल शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंन्टाईन आंदोलन आज
कृषी कायद्यांविरोधात रविवार १४ फेब्रुवारी रोजी शेतकरी जागर मंचतर्फे सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंन्टाईन आंदोलन राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शेतकरी जागर मंचतर्फे तिन्ही कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यात येणार आहे.