- सत्यशील सावरकरतेल्हारा : तालुक्यातील अकोली रूपराव या गावातील एका शेतकऱ्याने पिकांवर येणाऱ्या संकटाला कंटाळून अखेर दोन एकर केळी च्या बागेत रोटाव्हेटर मारले. याच वर्षी बागायती कपाशीवर सुद्धा बोगस कीटकनाशक फवारणी केल्याने या शेतकऱ्यांचे उभे पिक करपले होते. रूपेश लासुरकार हा अल्प भूधारक युवा शेतकरी आपल्या वडिलोपार्जित शेती व्यतिरिक्त गावातील शेजारी शेतकऱ्यांचे शेत बटाइने करित मोठ्या मेहनतीने पिक घेवून आर्थिक घडी सुधारण्यासाठी प्रयत्न करित असताना त्याला विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी शेतात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी दोन एकर केळी लागवड जुन महिन्यात केली सुरूवातीपासून पिकाची निगा राखून पिक जोमाने वाढविले; परंतु काही महिन्यातच केळी पिकावर अळी आली. त्याचा बंदोबस्त करित नाहीतोच पुन्हा वातावरणातील बदलाने करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्या साठी महागडे औषधे वापरून फवारणी केली. त्या दरम्यान आवश्यक आतंरमशागत करून रासायनिक खतांची मात्रा दिली.एवढे करूनही पुन्हा पिकावर खोडकिडा आला. हजारो रूपये खर्चून पिक सुकत असल्याचे पाहवले नाही. मोठ्या जड अंतकरणाने अखेर उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवून पिक नष्ट करावे लागेल, अशा परिस्थितीत खचून न जाता पुन्हा शेतात रब्बी हंगामात पिक घेण्याची तयारी करण्याचे रूपेश लासुरकार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे याच वर्षी या शेतकऱ्यांचे कपाशी पिकाचे बोगस कीटकनाशक दिल्या गेल्याने उभे पिक करपून नुकसान झाले होते हे विशेष.
हताश शेतकऱ्याने दोन एकर उभ्या केळी पिकात फिरवला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 2:54 PM