फळबाग लागवडीसाठी तालुका स्तरावर घेणार शेतकऱ्यांचे अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:24 PM2018-06-12T13:24:12+5:302018-06-12T13:24:12+5:30
अकोला : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात फळबाग लागवडीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
अकोला : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात फळबाग लागवडीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये १९ जूनपासून जिल्ह्यात तालुका स्तरावर शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन, त्यामध्ये फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात घेणार आहेत.
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात फळबाग लागवडीच्या क्षेत्रात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी फळबाग लागवड योजनेत जास्तीत -जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याकरिता, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पुढाकारात जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत १९ जूनपासून जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर तहसील कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी (रोहयो) यांच्यासह कृषी व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व तालुक्यातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळांमध्येच फळबाग लागवडीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
‘या’ फळपिकांची केली जाणार लागवड!
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात लिंबू, संत्रा, डाळिंब, आंबा, सीताफळ इत्यादी फळपिकांची लागवड करण्यात येणार आहे. फळबाग लागवड करणाऱ्या संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना शासनामार्फत अनुदान देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात फळबाग लागवडीचे प्रमाण वाढावे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी फळबाग लागवडीकरिता जिल्ह्यात तालुका स्तरावर शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन, शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी