सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आमहत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 10:38 AM2020-09-15T10:38:32+5:302020-09-15T10:38:50+5:30
खडकी येथील खासगी सावकाराकडून बँकेचे धनादेश देऊन पती किशोर इंगळे यांनी २० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
बार्शीटाकळी : तालुक्यातील चांगेफळ येथील शेतकरी किशोर शालीग्राम इंगळे (४५) यांनी खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून १२ सप्टेंबर रोजी विष प्राशन केले. उपचारादरम्यान १३ सप्टेंबर रोजी शेतकºयाचा मृत्यू झाला. पोलिसांनी खासगी सावकाराविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला.
मृतकांच्या पत्नीने बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. या शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. खडकी येथील खासगी सावकाराकडून बँकेचे धनादेश देऊन पती किशोर इंगळे यांनी २० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ४० हजार रुपये सावकारास परत केल्यावरही सावकार पुन्हा ५० हजार रुपये कर्ज थकीत असल्याचे सांगत होता. सावकार पतीला नेहमीच फोनद्वारे, प्रत्यक्षात भेदून पैशांसाठी तगादा लावत होता. त्याच्या जाचाला कंटाळून पती किशोर इंगळे यांनी विष द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात बार्शीटाकळी पोलिसांनी खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला.