पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल आहे. परंतु महाबीजचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
शेतकऱ्यांना महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी बियाण्यांसाठी वणवण फिरत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. परिणामी शेतकरी तूर, मूग, उडीद आदी पिकांकडे वळले आहेत. मागील वर्षी सततच्या पावसाने सोयाबीन पीक खराब झाले होते. अनेकांच्या घरात सोयाबीन बीज प्रक्रिया करायलासुद्धा बीजवाई उपलब्ध नाही. परिणामी अनेक महाबीजचे सोयाबीन बियाणे मिळेल या आशेवर शेतकरी अवलंबून होते. दोन-तीन दिवस पाऊस पडूनसुद्धा पेरणीसाठी बियाणे मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.