शेतकर्यांच्या सिंचन विहिरींचे वाढीव अनुदान रखडले
By admin | Published: August 12, 2014 12:55 AM2014-08-12T00:55:40+5:302014-08-12T00:55:40+5:30
जलपूर्ती विहिरी योजनेअंतर्गत शेतकर्यांचे दीड लाख रुपयांचे अनुदान रखडलेले आहे.
कुरुम: शासनाच्या जलपूर्ती विहिरी योजनेअंतर्गत विहित मुदतीत विहिरींचे बांधकाम केल्यानंतरही मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी येथील काही शेतकर्यांचे या योजनेअंतर्गत मिळणारे दीड लाख रुपयांचे अनुदान रखडलेले आहे. शासनाने तातडीने वाढीव अनुदान द्यावे, अन्यथा बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा या शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या एका निवेदनातून दिला आहे. मधापुरी येथील सुनील नीळकंठराव ठाकरे व गजानन यशवंतराव ठाकरे या दोन शेतकर्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी जलपूर्ती योजनेअंतर्गत शेतात विहिरी खोदून त्यांचे बांधकाम ३0 जून या विहिती मुदतीच्या आधीच पूर्ण केले. या योजनेअंतर्गत विहिरी खोदण्यासाठी त्यांना आधी एक लाख रुपये मिळाले. विहित मुदतीत बांधकाम पूर्ण केल्यानंतर मिळणारे दीड लाख रुपयांचे अनुदान मात्र त्यांना अजूनही मिळालेले नाही. विहिरी बांधण्यासाठी या दोघांनी जवळचे पैसे खर्च केले. त्यामुळे आता त्यांना वाढीव अनुदान मिळणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी यापूर्वीही जिल्हा प्रशासनाकडे विनंती अर्ज केले आहेत; परंतु शासनाकडून अद्यापही अनुदान मिळाले नाही. विहीर बांधण्याच्या कामात जवळचे सर्व पैसे खर्च झाल्यामुळे त्यांना यावर्षी पेरणीही करता आली नाही. त्यामुळे शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या या शेतकर्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. येत्या आठ दिवसांत वाढीव अनुदान मिळाले नाही, तर २0 ऑगस्टपासून अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा या शेतकर्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनाही दिल्या आहेत.