लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला, फळ उत्पादक शेतकºयांसमोर संकट उभे झाले होते; परंतु या संकटातही शेतकºयांनी मार्ग शोधत गट तयार करून ग्राहकांना घरपोच भाजीपाला, फळांची विक्री केली. ६९ शेतकरी गटांच्या माध्यमातून ५१४ मेट्रिक टन भाजीपाल्याची विक्री करीत शेतकºयांनी ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली. अकोला जिल्ह्यात आत्मामार्फत शेतकरी गट विकसित करण्यात आले आहेत. गटातील शेतकºयांनी शहरातील नागरिकांना ताजा व स्वच्छ भाजीपाला घरपोच देण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्या नेतृत्वात भाजीपाला उत्पादक शेतकºयांचे ६९ गट तयार करण्यात आले. या शेतकºयांनी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर, परराज्यातही भाजीपाला पाठविला. जिल्ह्यात विशेषत: नागरी भागात ९३ ठिकाणी थेट विक्री केंद्र सुरू केले. गटातील शेतकºयांनी आपल्या विक्री केंद्रामार्फत मोबाइलवर आॅर्डर मागविण्यास सुरुवात केली. त्यावर प्राप्त आॅर्डरनुसार, मालाचे पॅकिंग करून ग्राहकांना घरपोच माल पोहोचण्याचे काम हे शेतकरी करीत आहेत. यासाठी अर्थातच किमान अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे, शक्यतो आॅनलाइन पेमेंट स्वीकारणे यासारख्या उपायांचा वापर करण्यात येत आहे. तसेच गावात वा शहरातही मोक्याच्या जागी हे शेतकरी आपला माल घेऊन उभे राहतात. तेथे रीतसर माल मोजून ग्राहकांना दिला जातो. थेट ग्राहक विक्रीतून शेतकºयांची व्यापारी, अडते, वाहतूकदार, कमिशन एजंट यांच्या कचाट्यातून मुक्तता झाली. ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला विकून शेतकरी गटांना नफाच झाला. थेट ग्राहकापर्यंत भाजीपाल्याची विक्री होत असल्याने, शेतकºयांचा वाहतूक खर्चही वाचला. संचारबंदीच्या काळात या शेतकºयांनी ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. विभागीय तुलना केल्यास अकोला जिल्हा हा अमरावती विभागात सर्वाधिक उलाढाल करणारा जिल्हा ठरला आहे.
तालुकानिहाय शेतकरी गटांनी केलेली विक्रीअकोला तालुक्यात ५३ शेतकरी गटांनी २६ विक्री केंद्रांमधून ९२.२० मेट्रिक टन माल विक्री केला. मूर्तिजापूर तालुक्यात ४१ गटांनी १० केंद्रांमधून ७८.५० मे. टन माल विक्री केला. बार्शीटाकळी तालुक्यात ४३ गटांनी १४ विक्री केंद्रांमधून ६३.२० मे. टन माल विक्री केला. अकोट तालुक्यात ३७ गट १५ विक्री केंद्रांमधून ७५.६० मे. टन मालाची विक्री करू शकले. तेल्हारा तालुक्यात ३६ गटांनी १४ केंद्रांवर आपला ६९.८५ मे., टन माल विक्री केला. पातूर तालुक्यात ४० गटांनी ११ विक्री केंद्रांवर ६९.६० मे. टन माल विक्री केला. बाळापूर तालुक्यात ३८ गटांनी १४ केंद्रांवर ६४.८५ मे. टन मालाची विक्री केली.