पिंपळखुटा परिसरात पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:54+5:302021-06-20T04:14:54+5:30
नासीर शेख खेट्री : पातूर तालुक्यातील खेट्री, चतारी, पिंपळखुटा, चांगेफळ, शिरपूर, राहेर, आडगाव, वाहाळा, चान्नी आदी परिसरात पावसाने गेल्या ...
नासीर शेख
खेट्री : पातूर तालुक्यातील खेट्री, चतारी, पिंपळखुटा, चांगेफळ, शिरपूर, राहेर, आडगाव, वाहाळा, चान्नी आदी परिसरात पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाअभावी परिसरातील पिके करपण्याच्या मार्गावर असून, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पिकांना जीवनदान देण्यासाठी शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर द्वारे पिकांना पाणी देणे सुरू केले आहे ; मात्र महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विविध पिकांची पेरणी केली होती, परंतु कपाशी पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशी मोडून दुबार पेरणी केली. अशातच चार ते पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी कृषी पंपाद्वारे पिकांना वाचवण्यासाठी पाणी देण्यास सुरुवात केली आहे. महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
------------------------
सस्ती येथील वीज उपकेंद्राचा मनमानी कारभार !
सस्ती वीज उपकेंद्राचा गेल्या काही महिन्यापासून मनमानी कारभार सुरू असून, याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित वरिष्ठांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. थ्री फेज असो किंवा सिंगल फेज रात्रंदिवस वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पिके संकटात सापडले आहेत. अजून येत्या तीन ते चार दिवस पाऊस पडला नाही तर दुबार आणि काही परिसरात तिबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----------------------
पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारल्याने पिकांना वाचवण्यासाठी कृषी पंपाद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली, परंतु महावितरण विभागाच्या शून्य कारभारामुळे रात्रंदिवस वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने दुबार पेरणीचे संकट समोर आहे.
-राजेश जयराम कीर्तने, शेतकरी, चतारी.
-----------------
व्याजाने पैसे घेऊन पिकांची पेरणी केली आहे ; मात्र पावसाअभावी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. कृषी पंपाद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न सुरू केला असून, वीजपुरवठा खंडित होत असल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
-मोहम्मद आसीम, शेतकरी शिरपूर, चांगेफळ.
------------------
कपाशी पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने पीक मोडून दुबार पेरणी केली. अशातच पावसाने दडी मारल्याने स्प्रिंकलर द्वारे पिकांना पाणी देणे सुरू केले ; मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.
-नाजुकराव देशमुख, शेतकरी, पिंपळखुटा.