सर्वेक्षण : आत्महत्याप्रवण जिल्ह्यात कापसावर 48 % तणनाशकाचा वापर,  हेक्टरी मात्राबाबत ७९ % शेतक-यांना नाही माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 12:31 PM2018-01-20T12:31:32+5:302018-01-20T12:31:41+5:30

शेती कामे करण्यासाठी अलिकडे मजूर मिळत नसल्याने विदर्भातील शेतक-यांनी सोयाबीन, गहू पिकासोबतच कापूस पिकावर तणनाशकाचा वापर सुरू केला आहे.

Farming Survey at akola | सर्वेक्षण : आत्महत्याप्रवण जिल्ह्यात कापसावर 48 % तणनाशकाचा वापर,  हेक्टरी मात्राबाबत ७९ % शेतक-यांना नाही माहिती

सर्वेक्षण : आत्महत्याप्रवण जिल्ह्यात कापसावर 48 % तणनाशकाचा वापर,  हेक्टरी मात्राबाबत ७९ % शेतक-यांना नाही माहिती

Next

राजरत्न सिरसाट/अकोला : शेती कामे करण्यासाठी अलिकडे मजूर मिळत नसल्याने विदर्भातील शेतक-यांनी सोयाबीन, गहू पिकासोबतच कापूस पिकावर तणनाशकाचा वापर सुरू केला आहे. या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणात आत्महत्याप्रवण सहा जिल्ह्यातील ४८ टक्के शेतक-यांनी कापसावर तणनाशकाचा वापर केला; पण ७९ टक्के शेतक-यांना तणनाशकाची हेक्टरी मात्रा किती वापरावी, हेच माहिती नसल्याचे समोर आले आहे.

भरघोस उत्पादनासाठी शेतकरी पिकांची काळजी घेतात, यामध्ये तणाचा नायनाट करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. कापसामध्ये पीक -तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी पेरणीनंतरच्या २० ते ६० दिवसांचा आहे. या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास तणामुळे उत्पादनात ८० टक्केपर्यंत घट येत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. पिकातील तण काढण्यासाठी मजूरच मिळत नसल्याने कापसातील तणाचा नायनाट करण्यासाठी शेतक-यांनी तणनाशकाचा वापर सुरू केला आहे; पण तणनाशकाचा किती व कसा वापर केला जातो, याची माहितीच उपलब्ध नव्हती. या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ चमूने विदर्भातील आत्महत्याप्रवण अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ व वर्धा या सहा जिल्ह्यांत याबाबत सर्वेक्षण करू न संशोधन प्रकल्प तयार केला आहे.

या प्रकल्पासाठी निवड केलेल्या जिल्ह्यातील ज्या तालुक्यात कापूस पीक घेतले जाते, त्या तालुक्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर, बुलडाण्यातील मोताळा, वाशिममधील कारंजा(लाड), अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, यवतमाळमधील नेर, तर वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याचा समावेश होता. या प्रत्येक तालुक्यातील चार गावे व चार गावातील ज्यांच्याकडे कापूस पीक होते अशा १० शेतकरी कुटुंबाची निवड करण्यात आली होती, अशा २४ गावातील २४० शेतकºयांचा यामध्ये समावेश होता. सर्वेक्षणात कापूस उत्पादकांच्या घरी व शेतावर जाऊन सविस्तर मुलाखती तज्ज्ञांनी घेऊन पिकातील तणनाशके वापराविषयींच्या विविध बाबींवर सविस्तर माहिती घेण्यात आली. २०१४ मध्ये कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ चमूने सर्वेक्षणाला सुरुवात केली होती. ते सर्वेक्षण पूर्ण करू न अभ्यासाअंती आता पुस्तक रू पात संशोधन प्रकल्प तयार केला आहे.

संशोधन प्रकल्पातील निष्कर्ष
*४८ टक्के कापूस उत्पादक शेतक-यांनी तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर केला.
* ४२ टक्के शेतक-यांकडे सिंचनाची सोय नव्हती.
*पिकाखालील सरासरी क्षेत्र १.३५ हेक्टर असल्याचे निदर्शनात आले.
*५४ टक्के कापूस उत्पादक शेतकºयांना हेक्टरी २० क्ंिवटलपेक्षा जास्त उत्पादन झाल्याचे दिसून आले.
* २२ टक्के कापूस उत्पादक शेतकºयांनी पीक कर्ज घेतले नव्हते.
*७४ टक्के शेतक-यांनी शेतीच्या कामासाठी काही प्रमाणात मजुराची उपलब्धता असल्याचे सांगितले, तर १४ टक्के शेतकºयांनी मजूर मिळत नसल्याची माहिती दिली.
*४० टक्के शेतक-यांकडे बैलजोडी आढळून आली नाही.
*१७ टक्के शेतक-यांकडे स्वत:चा ट्रॅक्टर होता.
* १६ टक्के शेतक-यांनीच त्यावेळी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती.
* सर्वेक्षणात ४८ टक्के शेतक-यांनी तणनाशकांचा वापर केला, तर त्यावर्षी प्रथमच १८ टक्के शेतकºयांनी कापसावर तणनाशके वापरली.
* ९५ टक्के शेतकºयांकडे स्वत:चा स्प्रेअर पंप असल्याचे निदर्शनास आले.
* तणनाशकाचा वापर केलेल्या बहुतांश शेतक-यांनी कृषी सेवा केंद्राच्या संचालकांच्या सल्ल्यानुसार तणनाशके वापरली.
 
कापूस उत्पादकांनी तणनाशके कशी वापरली?
* ६३ टक्के शेतक-यांना शिफारशीप्रमाणे हेक्टरी मात्राबाबत माहिती नसल्याचे निदर्शनास आले.
*तणनाशकांची हेक्टरी मात्रा ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावी, अशी शिफारस कृषी विद्यापीठाने केलेली आहे; पण ७९ टक्के शेतक-यांना याबाबत माहिती नसल्याचे आढळून आले.

शेतकरी वापरत असलेली तणनाशके
कापूस पिकात जी तणनाशके वापरली जातात, त्यामध्ये ग्लायपोसेट (व्यापारी नाव : राऊंड अप, ग्लायसेल, मीरा-७१ )ला प्रथम पसंती दिल्याचे आढळून आले. दुसरी पसंती पायरोथओबॅक सोडियम (व्यापारी नाव: हिटविड) व क्विझॅलोफॉस इथाईल (व्यापारी नाव : टरगा सूपर) ही दोन्ही तणनाशके एकत्रित करून वापरत असल्याचे आढळले.

अभ्यासाअंती कृषी विद्यापीठाने केलेली शिफारस
संशोधन प्रकल्पातील प्रमुख संशोधक डॉ.एन.एम. काळे, सहसंशोधक डॉ. डी.एम. मानकर, डॉ.पी.पी. वानखडे व डॉ. जे.पी.देशमुख यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर संशोधन प्रकल्प तयार केला. त्यानंतरच्या अभ्यासाअंती कृषी विद्यापीठाने महत्त्वाची शिफारस केली.
राज्य शासनाच्या कृषी विभागाने विदर्भातील कापूस उत्पादक शेतकºयांना पेरणीपूर्व तणनाशक वापराविषयी प्रशिक्षण, कार्यशाळा प्रात्यक्षिके घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले, तसेच कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या सहाय्याने तणनाशकांच्या वापराविषयी छापील सामग्री तयार करू न घेऊन प्रचार व प्रसार करण्याचे म्हटले आहे. यामुळे शेतकºयांना तणनाशकाचे तांत्रिक ज्ञान मिळून त्याद्वारे प्रभावी तणनियंत्रण होण्यास मदत होईल, अशी ही शिफारस आहे.

तणनाशक शेतक-यांना वरदान
मजूर मिळत नसल्याने तणनाशके वरदान ठरत असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. तणनाशकामुळे तणाचे व्यवस्थापन करता येते.

२००९-१० मध्ये शेतकरी केवळ कापसावर ५ टक्के तणनाशकांचा वापर करीत असत. आता यामध्ये वाढ झाली आहे. आम्ही जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा ४८ टक्के शेतकºयांनी तणनाशके वापरली. आता यामध्ये आणखी वाढ होत आहे. त्यासाठी शेतकºयांनी शिफारशीनुसार तणनाशकांची मात्रा वापरणे गरजेचे आहे; पण सर्वेक्षणात ७९ टक्के शेतकºयांना याबाबत पूर्ण माहिती नव्हती, त्यासाठी नव्याने शिफारस केली आहे. - डॉ. एन.एम. काळे, प्रमुख संशोधक, सर्वेक्षण प्रकल्प, विस्तार व शिक्षण विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Web Title: Farming Survey at akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.