जीवघेणी वाहतूक, पोलिसांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:27+5:302021-06-16T04:26:27+5:30
जलवाहिनीला गळती; पाण्याचा अपव्यय सुरूच! नया अंदुरा : कारंजा रमजानपूर प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे ११ पैकी आठ बोअरवेल कोरडे ...
जलवाहिनीला गळती; पाण्याचा अपव्यय सुरूच!
नया अंदुरा : कारंजा रमजानपूर प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे ११ पैकी आठ बोअरवेल कोरडे पडले असून तीन बोअरवेलवर १० गावांना पाणीपुरवठा होत असल्याने १० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कारंजा रमजानपूर, नया अंदुरा, शिंगोली, हातला, लोणाग्रा, सोनाळा, निंबा फाटा अंदुरा, आडसूळ व मालवाडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
मुंडगाव येथे गुटखा विक्रेत्याविरुद्ध कारवाई
मुंडगाव : गावात प्रतिबंधित तंबाखू, गुटखा, सिगारेटची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. लॉकडाऊन काळातही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. रविवारी दहशतवादविरोधी पथकाने मुंडगाव येथे छापा घालून गुटखा विक्री करणाऱ्यांकडून गुटखा जप्त करून अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आता लाॅकडाऊन वाढवू नये!
मूर्तिजापूर : कोरोनामुळे प्रशासनाने टाळेबंदी लागू केली होती. परंतु आता शासनाने अनलॉकची घोषणा केली आहे. समस्त व्यापाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन केले आहे. परंतु असे असूनही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतच आहे. प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन वाढवू नये, अशी मागणी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष लखन अरोरा यांनी केली आहे.
आठ वर्षांपासून शेतामध्ये वीज नाही!
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील अंधार सांगवी येथील शेतकऱ्याने सहा हजार सहाशे रुपये महावितरण कंपनीकडे कोटेशन भरूनसुद्धा आठ वर्षांपासून शेतामध्ये विद्युत कनेक्शन देण्यात आले नाही, अशी तक्रार राजेश सीताराम राठोड यांनी केली.
पिंजर आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नाही
निहिदा : गावातील एका पिसाळलेल्या कुत्र्याने काही दिवसांपासून धुडगूस घातला आहे. आतापर्यंत या पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेऊन जखमी केले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. रुग्ण उपचारासाठी पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात, परंतु तेथे रेबिजची लस उपलब्ध नसल्याने, रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात जावे लागत आहे.
मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे नागरिक त्रस्त
निहिदा : गेल्या दोन महिन्यांपासून खासगी कंपनीचे मोबाईल नेटवर्क व्यवस्थित चालत नसल्याने पिंजर परिसरातील मोबाईलधारक कमालीचे त्रस्त बनले आहे, माेबाईल कंपन्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून गावा-गावात टॉवर उभारले; परंतु नेटवर्कच्या सुविधेकडे लक्ष दिले जात नाही. ग्राहकांनी तक्रार किंवा फोनवर सूचना दिली तर, त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे ग्राहक अधिकच हैराण बनले आहेत.
लाखपुरी १७ गाव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी
मूर्तिजापूर: वर्षानुवर्षे खारे पाणी पिल्याने प्रसंगी किडनीच्या आजाराला बळी पडून त्रस्त बनलेल्या जनतेच्या खारपाण पट्ट्यातील समस्या मार्गी लावण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता लाखपुरी १७ गाव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळवून दिली आहे.
कृषी वीज जोडणी खंडित न करण्याची मागणी
तेल्हारा : कोरोना टाळेबंदी काळातील वीज देयक माफ करू, असे आश्वासन महाविकास आघाडी सरकारने दिले हाेते. मात्र, काही काळ वीज ताेडणी माेहिमेला स्थगिती देऊन पुन्हा वीज ताेडणी माेहीम सुरू केली आहे. घरगुती व कृषी वीज जोडणी खंडित न करण्याची मागणी तेल्हारा तालुका भाजपने निवेदनातून केली आहे.
चोंडा नाल्याचे खोलीकरण करा
आगर : हातला-लोणाग्रा शेतशिवारातून वाहणाऱ्या चोंडा नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे, याबाबत शेतकऱ्यांनी लेखी मागणी करून चार महिने झाले असून अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही. शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याबद्दल शेतकऱ्यांनी राेष व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांनी परत केले तुटपुंजा विम्याचे चेक
अकाेला : अकाेट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले असून, त्यांना फळपीक विम्याच्या दाव्याची रक्कम अत्यल्प मंजूर झाली आहे. ज्या विम्याचा प्रीमिअम आठ हजार आहे, त्या विम्यापाेटी केवळ हेक्टरी २६५, तर काहींना ५०० रुपये मंजूर झाल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला. विम्याचा दावा देताना विमा प्रतिनिधीने भेदभाव केल्याचा आरोप करीत, शेतकऱ्यांनी तुटपुंजा विम्याचे धनादेश परत दिले.
अकोला-मेडशी निर्माणाधीन रस्ता खचला!
पातूर : अकोला-मेडशीदरम्यान निर्माणाधीन महामार्गाला भंडारजजवळील श्री हनुमान मंदिराकडील बाजूस अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या कडेने भूस्खलन झाल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. याबाबत नागरिकांनी कंपनीच्या कारभाराविराेधात राेष व्यक्त केला.
ग्रामीण भागामध्ये उघड्यावरच शौच
पातूर : शहरासह तालुक्यामध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र नियोजनशून्य कारभारामुळे आणि ठेकेदारीचे ग्रहण लागल्यामुळे सदर योजनेचा बाेजवारा उडाला आहे. ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावरच शौचक्रिया करत असून ग्रामीण भागामध्ये अस्वच्छता पसरत असल्यामुळे साथरोगांना आमंत्रण मिळत आहे.
वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या तुलंगा बु. व खुर्द, दिग्रस बु. सस्ती गावांसह अनेक गावांत शनिवारी व रविवारी सायंकाळच्या दरम्यान वादळ- वाऱ्यासह पाऊस पडताच, रात्रभर वीज जात असल्याचा प्रकार घडत असल्याने ग्रामस्थ त्रस्त बनले आहेत. विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कोविड लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा
हातरुण : कोविडचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. लसीकरण आणि मास्क हे दोनच कोरोनावर उपाय आहेत. या दोन गोष्टींच्या माध्यमातून आपण कोरोनावर मात करू शकतो. लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामीण भागात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले यांनी दिले.