मुलीला उपचार मिळत नसल्याने पित्याची पोलिसांत तक्रार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:36 PM2019-08-31T12:36:33+5:302019-08-31T12:36:41+5:30
रुग्ण युवतीच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा आरोप पित्याने करीत, शुक्रवारी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाविरुद्ध कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली.
अकोला : आजारी मुलीला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती केले; परंतु तिला योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्याकडे केली; परंतु त्यानंतरही मुलीला व्यवस्थित उपचार मिळाले नाहीत. सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर हे गरीब रुग्ण युवतीच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा आरोप पित्याने करीत, शुक्रवारी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाविरुद्ध कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली.
पातूर येथील रहिवासी एका पित्याने त्यांच्या २१ वर्षीय जागृती नामक मुलीला पातूर येथील प्राथमिक उपचार केंद्रामध्ये भरती केले होते; परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड क्रमांक- ७ मध्ये भरती करण्यात आले. २४ ते २८ आॅगस्ट या चार दिवसांत मुलीला आराम मिळाला नाही व प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. उलट प्रकृती आणखीनच बिघडत गेली. याबद्दल रुग्णालयातील अधिकाऱ्यांना माहिती दिली; परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे २८ आॅगस्ट रोजी त्यांनी रुग्णालयात उपचारात हलगर्जी करण्यात येत असून, रुग्णांना उपचार मिळत नसल्याची तक्रार अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांच्याकडे केली. त्यांनीही तक्रारीची दखल घेतली नाही. उलट रुग्णालयातील डॉक्टरांनी तक्रार केली म्हणून उपचारामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जी केली आणि त्यांच्या मुलीला उपचारापासून वंचित ठेवले, असा आरोप मुलीच्या वडिलांनी करीत शुक्रवारी दुपारी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली. कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी तक्रार दाखल केली. ही तक्रार चौकशीत ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)