वडिलांच्या ताब्यातील चिमुकली आईच्या स्वाधीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:11 AM2018-02-08T02:11:10+5:302018-02-08T02:13:57+5:30
अकोला : कौटुंबिक वादातून वडिलांनी ११ महिन्यांच्या चिमुरड्या मुलीला आईपासून अलिप्त केले. शेवटी आईचे काळीजच ते. पोटच्या गोळय़ापासून ती कशी अलिप्त राहील. अखेर तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि मुलीला ताब्यात देण्याची विनवणी न्यायालयाला केली. न्यायालयानेही तिच्या ममतेची जाणीव ठेवत चिमुरडीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्याचा वडिलांना आदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क

मे २0१६ मध्ये जुने शहरातील युवतीचा शिवणीतील युवकाशी विवाह झाला. पुढे त्यांना मुलगी झाली. सुखी संसाराचे स्वप्न रंगवित असतानाच, पतीने पत्नीची आई व आजीला लग्नात हुंडा कमी दिला. सोन्याचे दागिने दिले नाहीत म्हणून वाद घातला. या वादात पतीने पत्नीच्या आई व आजीला शिवीगाळ करून मारहाण केली आणि पत्नीसह त्यांनाही घराबाहेर हाकलून दिले. चिमुरड्या मुलीलाही त्याने ताब्यात घेतले. मुलीचे तोंड पाहू देणार नसल्याची तंबीही त्याने पत्नीला दिली. चिमुरड्या मुलीसाठी आई आसुसली होती. परंतु, पती तिला भेटू देईना. अखेर पत्नीने एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तिला महिला तक्रार निवारण कक्षाकडे पाठविले. परंतु, तिथेही न्यायासाठी तिला काही महिने वाट पाहावी लागणार असल्याने तिने, न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि मुलगी मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणात न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. न्यायालयाने आईच्या भावना लक्षात घेत, मुलगी तिच्या ताब्यात देण्याचा पतीला आदेश दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर मुलगी ताब्यात मिळाल्यानंतर तिने मुलीला घट्ट मिठी मारली.