भय इथले संपत नाही; दहा वर्षांत ३१ जणांचा किडनीच्या आजाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:19 AM2021-05-09T04:19:40+5:302021-05-09T04:19:40+5:30
संतोषकुमार गवई पातूर : तालुक्यातील चतारी येथे किडनी आजाराचे थैमान सुरूच असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथे गत ...
संतोषकुमार गवई
पातूर : तालुक्यातील चतारी येथे किडनी आजाराचे थैमान सुरूच असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथे गत दहा वर्षांत जवळपास ३१ जणांचा मृत्यू किडनीच्या आजाराने झाला असून, सद्यस्थितीत १००च्यावर रुग्णांवर उपाचार सुरू असल्याचे चित्र आहे.
किडनी आजाराचे गावाला ग्रहण लागले असून, दरवर्षी चार ते पाच जणांचा किडनीच्या आजाराने मृत्यू होत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली असून, प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र आहे. सन २००९-१० या वर्षापासून चतारी येथे किडनी आजाराचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. गावात पाण्याची पातळी घटल्याने पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण वाढले. नागरिकांना दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्याने क्षारयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते. यामुळेच गावात किडनी आजाराचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.
-----------------------------
मृत्यूमध्ये युवकांची संख्या अधिक
चतारी येथे किडनीच्या आजाराने गत दहा वर्षात ३१ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये सर्वाधिक संख्या युवकांची आहे. गेल्या दहा वर्षापूर्वी किडनीच्या आजाराने मृत्यू होण्याचे सुरू झालेले सत्र अद्यापही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. गावाचे भविष्यच धोक्यात असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
----------------------------------------
आरओ प्लांट ठरतोय कुचकामी
गावात खासदार निधीतून ‘आरओ प्लांट’ उभारण्यात आला; मात्र यासाठी अपुरे पाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकांना क्षारयुक्त पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. यामुळे गावात किडनीच्या आजाराचा धोका बळावला आहे.
---------------------
ग्रामीण रुग्णालयही आजारी!
चतारी येथे ग्रामीण रुग्णालय असून आजारी असल्याचे चित्र आहे. ग्रामीण रुग्णालयाची इमारत शिकस्त झाली असून, रुग्णालयामध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.