- सागर कुटे
अकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये जैविक शेती मिशन राबविण्यात येत आहे. या माध्यमातून सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांचा महासंघ तयार करण्यात येत असून, २४ हजार ७०० एकर क्षेत्रात सेंद्रिय उत्पादन घेण्यात येणार आहे. याकरिता ३५ शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती करण्यात आली आहे. जैविक पद्धतीने उत्पादित शेतमालाचे सेंद्रिय प्रमाणिकरण, प्राथमिक प्रक्रिया, बाजारपेठ शृंखला, समूह गट स्थापन करून त्या माध्यमातून शेती उत्पादनांना बाजारपेठेसोबतच योग्य भाव मिळावा. यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन निव्वळ नफ्यात वाढ व्हावी. यासाठी राज्य पुरस्कृत सेंद्रिय शेती / विषमुक्त शेती ही योजना प्रथम टप्प्यात विदर्भातील आत्महत्याग्रस्त बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. तसेच या योजनेसाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना करण्यात आली आहे. या मिशनचा कार्यकाळ ४ वर्षांचा आहे. या योजनेत ६ जिल्ह्यांमध्ये ३४५ गट स्थापन केले आहेत.
--बॉक्स--
२०-२५ शेतकऱ्यांचा एक गट
सहा जिल्ह्यांमध्ये ३४५ गट स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये एका गटात २० ते २५ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. या योजनेत समाविष्ट शेतकऱ्याला त्याच्या संपूर्ण शेती क्षेत्रावर सेंद्रिय उत्पादन घ्यावे लागणार आहे. यातील प्रत्येक गट २०- ते २५ किमी. क्षेत्रात आहे.
संपूर्ण साखळी तयार
सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी संपूर्ण साखळी तयार करण्यात आली आहे. यामध्ये शेतकरी थेट ग्राहकाला शहरातील निर्धारित ठिकाणी माल विक्री करतील. प्रत्येक दहा गटांच्या समूह संघटन केंद्राने एक फार्मा प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली आहे. याच गटातील शेतकऱ्यांनी या कंपनीत शेअर विकत घेतले आहेत. प्रत्येक कंपनीचे २०० - २५० मेट्रिक टन माल साठवणुकीसाठी गोडावून तयार करण्यात येणार आहे. याच ठिकाणी फार्मा प्रोड्युसर कंपनी सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांचा माल विकत घेणार व शहरात विविध ठिकाणी विक्री करणार आहे. या सर्व कंपन्यांचा एक महासंघ तयार होणार आहे.
‘मॉम’ ब्रॅन्डने होणार ओळख
शेतकऱ्यांच्या सर्व मालाची विक्री ही महाराष्ट्र ऑरगॅनिक मिशन (मॉम) या नावाने होणार आहे. शेअरच्या माध्यमातून प्रत्येक फार्मा प्रोड्युसर कंपनीकडून ५ लाख रुपये घेण्यात येणार आहेत, तर १३ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
जमिनीचे, मानवाचे आरोग्य चांगले राहावे, पर्यावरणाचे संतुलन बिघडून जमिनीतील जैविक घटकांचा विनाश होऊ नये, याकरिता सहा जिल्ह्यात हे मिशन राबविण्यात येत आहे. तसेच शेती हे श्वाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून बघता येणार आहे.
आरीफ शाह, उपसंचालक, जैविक शेती मिशन
विदर्भात एकूण एकरावर उत्पादन
२४५००
शेतकऱ्यांचा सहभाग
७५००
शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती
३५
गोडावून निर्मितीसाठी लागणारा खर्च
१८ लाख रुपये
प्रत्येक शेतकऱ्याला शेअरसाठी येणार खर्च
४००० रुपये