नववर्षदिनी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडी-चोळी देऊन सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 04:29 PM2019-04-07T16:29:00+5:302019-04-07T16:31:23+5:30
अकोल्यातील व्यक्तिमत्त्व सुनील गोहर यांनी गुढीपाडवा या हिंदू नववर्षदिनी जिल्हा स्त्री रुग्णालयात २२ मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडी-चोळी व मिठाई देऊन सन्मान केला.
अकोला : ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, हा संदेश जवळपास सर्वच जण देतात. त्याकरिता सर्वच स्तरातून प्रयत्नसुद्धा मोठ्या प्रमाणावर शासन तथा प्रशासनाकडून केले जात आहेत. आजघडीला त्याला मोठ्या प्रमाणात यशसुद्धा मिळाले; पण मुलींच्या जन्माचे कौतुक आगळ्या-वेगळ्या रीतीने व्हावे, हा चंग मनाशी बाळगून एक ध्येयवेडे अकोल्यातील व्यक्तिमत्त्व सुनील गोहर यांनी गुढीपाडवा या हिंदू नववर्षदिनी जिल्हा स्त्री रुग्णालयात २२ मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडी-चोळी व मिठाई देऊन सन्मान केला. इतर २९ मातांनासुद्धा साडी-चोळी देऊन गौरविले तसेच त्यांनी या मातांना मतदान करण्याची विनंतीदेखील केली. यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पाटील, रोशनी गोहर, प्रमोद डेंगे, हरीश पवार, शिवा जयपिल्ले व भोलेशंकर धामणे प्रामुख्याने उपस्थित होते.
हिंदू नववर्षदिनी सामाजिक कार्यकर्ते सुनील गोहर हे नेहमीच ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, हा संदेश जनमानसापर्यंत आपल्या परीने पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतात. नववर्ष व नवीन मुलींचा जन्म हा योगायोग साधून त्यांनी ५१ साडी-चोळींचे वितरण जिल्हा स्त्री रुग्णालयात हा उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.