शासनाच्या वृक्षारोपण मोहिमेला ग्रामपंचायतींचा हरताळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 01:58 PM2019-07-19T13:58:20+5:302019-07-19T13:59:29+5:30
ग्रामीण भागात वाटप करण्यात आलेल्या रोपांचे ढीग साचले असून, ही रोपे वाळत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
- नितीन गव्हाळे
अकोला: निसर्गाचा ढासळत असलेला समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातून ३३ टक्के वृक्ष हवेत. त्यासाठी राज्य शासनाने एकच लक्ष्य...३३ कोटी वृक्ष...ही मोहीम सुरू केली. या मोहिमेत शासनाच्या सर्व विभागांसह सामाजिक व सांस्कृतिक संस्थांना सहभागी करून घेतले. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला वृक्ष लागवडीचे टार्गेट देऊन त्यांना विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप केले; परंतु ग्रामीण भागात वाटप करण्यात आलेल्या रोपांचे ढीग साचले असून, ही रोपे वाळत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. ग्रामपंचायतींकडूनच शासनाच्या वृक्ष मोहिमेला हरताळ फासल्या जात आहे.
निसर्गाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे जमिनीची धूप होऊन पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हाच एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्रासह प्रत्येक जिल्हा हिरवागार करून जिल्ह्यामध्ये ३३ टक्के वनराईचा उद्देश सफल व्हावा, यासाठी शासनाने ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या महामोहिमेंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला ५0 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. जिल्हा प्रशासनाने सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील २0१९-२0 वर्षासाठी प्रत्येक ग्रामपंचायतला रोपवाटिकेतून ३,२२0 रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. १ जुलै ते ३१ आॅगस्टदरम्यान कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण पंचायतींना ई-क्लास जमीनसह रस्त्याच्या दुतर्फा, नदी, नाले, कॅनॉलच्या काठांवर वृक्षारोपण करावे लागणार आहे; परंतु ग्रामपंचायती वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. अकोला पूर्व मतदारसंघातील दहीगाव गावंडे, रामगाव, धोतर्डी, पळसो बढे येथील ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या वृक्षांच्या रोपांचे ढीग तसेच पडून असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दहीगाव गावंडे येथील कॅनॉलजवळ तर शेकडो रोपांचे ढीग पडून असून, उन्हामुळे ही रोपे वाळत असल्याचे दिसून आले आहे. ग्रामपंचायतने कॅनॉल परिसरात एकाही वृक्षाची लागवड केली नसून, वृक्ष लागवडीबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने पंचायत समिती स्तरावरून वृक्ष लागवडीची माहिती मागवावी, अशी मागणी होत आहे.
कॅनॉल परिसरात ३२२0 रोपे पडून!
दहीगाव गावंडे ग्रामपंचायतच्या हद्दीत येणाऱ्या कॅनॉल परिसरात वृक्ष लागवडीसाठी विविध जातींची ३२२0 रोपे देण्यात आली; परंतु ग्रामपंचायतने वृक्ष लागवड केली नाही. त्यामुळे शेकडो रोपांचे ढीग कॅनॉल परिसरात पडून, उन्हामुळे ही रोप वाळत आहेत.
पाऊस पडत नसल्यामुळे वृक्षारोपणाची मोहीम थांबली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये रोपे पडून आहेत; परंतु कुठे वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष होत असेल आणि रोपे वाळत असून, बेवारस पडली आहेत. ही गंभीर बाब आहे. याची माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल.
-विजय माने, विभागीय वन अधिकारी,
सामाजिक वनीकरण विभाग.