अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूची सबब पुढे करीत शहरातील सर्व्हिस लाइन व नाले-गटारांची साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ही बाब लक्षात घेता मनपाचा स्वच्छता व आरोग्य विभाग, तसेच आरोग्य निरीक्षक झोपेत आहेत का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात मूलभूत सुविधांचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील सर्व्हिस लाइन, तसेच नाल्यांमध्ये घाण साचली आहे. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांचे मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे धोरण असले तरी त्यांच्या उद्देशाला स्वच्छता विभागातील अधिकारी व आरोग्य निरीक्षक हरताळ फासत असल्याची परिस्थिती आहे. मनपाच्या आस्थापनेवरील ७४० सफाई कर्मचाऱ्यांची प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली असून, २३ पडीत वाॅर्डमध्ये खाजगी तत्त्वावर प्रत्येकी चौदा सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत कोरोनाच्या सबबीखाली प्रभागांमध्ये साफसफाईच्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. यामुळे सर्व्हिस लाइनमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून तुंबलेल्या नाल्यांमुळे डासांची समस्या निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे संबंधित प्रभागातील नगरसेवक, तसेच महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आरोग्य निरीक्षकांना जबाबदारीचा विसर
प्रभागांमधील दैनंदिन साफसफाईची पाहणी करून तसा अहवाल क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली आहे. बहुतांश आरोग्य निरीक्षक नगरसेवकांच्या इशाऱ्यावर काम करतात. आजरोजी प्रभागांमध्ये निर्माण झालेली स्वच्छतेची समस्या लक्षात घेता आरोग्य निरीक्षकांना जबाबदारीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
आयुक्तसाहेब कामाचा अहवाल मागवा!
पडीत प्रभागातील साफसफाईच्या कामाचे कंत्राट बहुतांश नगरसेवकांनी मिळविले आहे. मागील काही दिवसांपासून पडीत प्रभागांमधील साफसफाईची कामे बंद आहेत. शहरात निर्माण झालेली अस्वच्छतेची समस्या लक्षात घेता संबंधित आरोग्य निरीक्षक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून मनपा आयुक्तांनी दैनंदिन कामकाजाचा अहवाल मागविण्याची गरज निर्माण झाली आहे.