सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी भाजप-सेनेमध्ये चढाओढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 10:32 AM2020-09-13T10:32:37+5:302020-09-13T10:32:55+5:30
दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रके काढून सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे दिसून आले.
अकोला: सरकारी बगिच्याचा विकास करण्यात येत आहे. या विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी भाजप-शिवसेनेमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सरकारी बगिच्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा कार्यक्रम झटपट आटोपून घेतला तर सरकारी बगिच्याचे सौंदर्यीकरण व विकास कामांसाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिल्याचा दावा शनिवारी भाजपने केला आहे.
दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रके काढून सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. सध्या या दोन्ही पक्षांमध्ये लोकप्रतिनिधींचे निधी वाटप, विकासकामांबद्दल चांगलाच कलगीतुरा रंगत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सरकारी बगिचा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीचा आहे. या बगिच्याच्या सौंदर्यीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवारी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य व आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, आमदार विप्लव बाजोरिया यांच्या नेतृत्वात शिवसेनेने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा फलक झटपट लावण्यात आला. नामकरणाला कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा आमदार बाजोरिया यांनी केला, तसेच बगिच्याच्या विकासासाठी ५0 लाख रुपयांचा निधी देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नामकरणाच्या या मुद्यावर आता भाजप-शिवसेनेतील राजकारण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे सरकारी बगिच्याच्या सौंदर्यीकरणासाठी आमदार शर्मा यांनी आतापर्यंत एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून बगिच्याचा विकास करण्यात येत आहे; मात्र काही राजकारणी प्रसिद्धीसाठी उद्यान विकासाचे श्रेय स्वत: लाटून घेत आहेत, असा टोला आमदार गोवर्धन शर्मा यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा नामोल्लेख न करता लगावला आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष निधी आणला. शहरातील रस्त्यांसोबत उद्यानासाठीदेखील निधी उपलब्ध करून दिल्याचा दावा भाजपने करीत, सरकारी बगिच्याच्या विस्तारीकरणासोबत सकाळी आपले आरोग्य नीट राहावे, यासाठी बगिच्यात फिरणाऱ्यांसाठी वॉकिंग ट्रॅक तयार केला. पथदिवे, वृक्षारोपण करून ओसाड पडलेल्या सरकारी बगिच्याचा विकास केल्याचा दावा भाजपने केला आहे. सरकारी बगिच्याच्या विकासकामांचे श्रेय लाटण्याच्या मुद्यावरून भाजप-सेनेमध्ये चांगलेच राजकारण पेटले आहे.
सरकारी बगिच्याचा विकास करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिला. बगिच्याचा विकास कोणाच्या निधीतून होत आहे, हे जनतेला माहीत आहे; परंतु काही राजकारणी विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, हे चुकीचे आहे. बगिच्याला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास आमचा विरोध नाही; परंतु कायदेशीर पद्धतीने नाव द्यावे.
-गोवर्धन शर्मा, आमदार.
परिसरातील युवकांनी सरकारी बगिच्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेकडे केली होती. त्यानुसार आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेमध्ये हा प्रस्ताव मांडला. त्याला मंजुरी मिळाली. कृषी विद्यापीठाच्या परवानगीनेच बगिच्याला नाव देण्यात आले.
-नितीन देशमुख, आमदार तथा जिल्हा प्रमुख शिवसेना.