मूर्तिजापूर : बोरगाव मंजू पोलीस ठाण्यातंर्गत तालुक्यातील गोरेगाव पुंडलिक महाराज येथे शांततेत मतदान होत असताना एकाच गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. मतदान केंद्रात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून पंधरा ते वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगाव पुंडलिक महाराज येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक १५ जोनेवरी रोजी सकाळपासून जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रात शांततेत सुरू होती. परंतु, सकाळी ११:३० मतदान केंद्र परिसरात दोन गटांत तणाव निर्माण होऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली. कर्तव्यावर असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय काशीराम इंगळे, पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला यांनी बोरगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. कर्मचारी निवडणूक बंदोबस्तकामी असताना शुक्रवारी मतदान केंद्रात ११ वाजेच्या सुमारास मंगेश गावंडे हे चार ते पाच सहकाऱ्यांसह मतदान केंद्रात आले. मतदान सुरळीत सुरू असताना याच गावातील भूषण सरदार १५ ते २० जणांना सोबत घेऊन आला. दरम्यान, गावंडे व सरदार या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली. पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून मंगेश गावंडेसह पाच इसम, भूषण सरदारसह पंधरा ते वीस जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून भूषण रमेश सरदार (वय २९), रोषण रमेश सरदार (३४), अक्षय दिलीप सरदार (२४), भारत आनंदराव सरदार (५४),कैलास दौलत सरदार (५७), अक्षय मधुकर सिरसाट (२१) सर्व राहणार गोरेगाव व मंगेश वाल्मिक गावंडे (३७), वाल्मिक उंद्राजी गावंडे (६५) दोघेही राहणार सोनोरी या आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके करत आहेत.