अखेर उड्डाण पुलाच्या पायाभरणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 02:10 PM2019-06-23T14:10:01+5:302019-06-23T14:10:21+5:30
अकोला : जेल चौक ते माऊंट कारमेल हायस्कूलपर्यंत विस्तारित होत असलेल्या अकोल्यातील उड्डाण पुलाच्या पायाभरणीस शुक्रवारी रात्री मध्यरात्री सुरुवात झाली.
अकोला : जेल चौक ते माऊंट कारमेल हायस्कूलपर्यंत विस्तारित होत असलेल्या अकोल्यातील उड्डाण पुलाच्या पायाभरणीस शुक्रवारी रात्री मध्यरात्री सुरुवात झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जयपूरच्या तज्ज्ञ चमूने शुक्रवारी दुपारी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर काँक्रिटीकरणास हिरवी झेंडी दिली. त्यानंतर कंपनीने शुक्रवारी मध्यरात्री तातडीने सुरुवात करण्यात आली.
गेल्या चार वर्षांपासून बहुप्रतीक्षेत असलेल्या साडेतीन किलोमीटर अंतराच्या उड्डाण पुलाच्या कामास मार्चमध्येच सुरुवात झाली. १६३.९६ कोटींच्या खर्चातून उभारल्या जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा कंत्राट हरियाणा हिस्सार येथील जान्डू कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतल्यानंतर मार्च महिन्यात सॉइल टेस्टिंगचे नमुने घेतले. त्यानंतर उड्डाण पुलाच्या मार्गात येत असलेल्या भागातील वृक्ष आणि पथदिवे हटविण्याची परवानगी महापालिका प्रशासनास मागितली; मात्र ही परवानगी वेळेच्या आत न मिळाल्याने कंपनीने आहे त्या परिस्थितीत काम सुरू केले. मध्यवर्ती कारागृहासमोर आली पेट्रोल पंपाशेजारी दोन ठिकाणी उड्डाण पुलाच्या पिल्लर उभारणीसाठी खोदकाम सुरू केले. जेलसमोरील आणि पेट्रोल पंप शेजारील बलाढ्य पिल्लरची लोखंड बांधणीदेखील कंपनीने करून घेतली; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अंतिम परवानगी देणाºया चमूची पाहणी झाली नव्हती. दरम्यान, प्रत्यक्ष पाहणीचा सर्व्हे न केल्याने पुढील कामकाज करणे थांबले होते. शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जयपूरच्या तज्ज्ञ चमूने पिल्लरची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर पुढील बांधकामास हिरवी झेंडी दाखविली. या चमूत अरविंद कुमार, मुरारी बाबू, अमरावती येथील टीम लीडर तनपुरे, अकोला येथील प्रकल्प अधिकारी सुहास भिडे येथे प्रामुख्याने उपस्थित होते. शुक्रवारी दुपारी बांधकामाची परवानगी मिळताच शुक्रवारी मध्यरात्री कंपनीने पेट्रोल पंपाजवळील लोखंड बांधलेल्या पिल्लरची पायाभरणी सुरू केली. शुक्रवारी रात्री ११ वाजता सुरू झालेले हे बांधकाम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. खडकी येथील प्लांटवरून काँक्रिट मटेरियल आणून या पिल्लरमध्ये टाकले गेले. बहुप्रतीक्षित अशा महत्त्वाकांक्षी उड्डाण पुलाच्या बांधकामास शुक्रवारी एकदाची सुरुवात झाली.