अखेर लसींचा साठा उपलब्ध, अकोटात आजपासून लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:20 AM2021-05-06T04:20:23+5:302021-05-06T04:20:23+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २ मेपर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असून, ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे अकोट ग्रामीण ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २ मेपर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असून, ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे अकोट ग्रामीण रुग्णालयात गत ६ दिवसांपासून लसीकरण केंद्र ठप्प पडले होते. दररोज नागरिक ग्रामीण रुग्णालयात चकरा मारत होते. परंतु लस नसल्याचे फलक पाहून संताप व्यक्त करीत परत जात होते. दरम्यान, अकोट ग्रामीण रुग्णालय येथील कोविड-१९ लसींचा साठा उपलब्ध झाला.
यामध्ये कोव्हॅक्सिन लस ही १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस देण्यात येणार आहे. मात्र, सेकंड डोससाठी लसीकरण राहणार नाही. तसेच कोविशिल्डची लस सेकंड डोसकरिता ७० टक्के उपलब्ध राहील. पहिल्या डोससाठी ३० टक्के लस उपलब्ध राहणार आहे.
त्यामुळे अकोटमधील ठप्प पडलेले लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाकरिता नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये पुरेशी व्यवस्था व नियोजन करणे आवश्यक झाले आहे.
ग्रामीण रुग्णालयात लस घेण्याकरिता आलेल्या नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. या ठिकाणी केवळ एक संगणक लावण्यात आले आहे. या संगणकावर पडताळणीकरिता चार तास लागत आहेत, तर लस घेण्याकरिता मात्र एक मिनिट लागत आहे. त्यामुळे लसींचा पुरवठा झाल्यानंतर शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, याकरिता संगणक वाढवून या ठिकाणी महिला व पुरुषांकरिता वेगळी व्यवस्था तसेच शहरात लसीकरण केंद्राची संख्या वाढवणे आवश्यक आहे.