अखेर जिल्हा परिषद निवडणुकीचा वाजला बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:43 AM2019-11-20T10:43:20+5:302019-11-20T10:43:45+5:30
जिल्हा परिषदेचे ५३ गट, सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या सदस्य निवडीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
अकोला : राज्यातील पाच जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम अखेर मंगळवारी घोषित करण्यात आला. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. अकोला जिल्हा परिषदेचे ५३ गट, सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या सदस्य निवडीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ८ जानेवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे.
आरक्षित जागांच्या संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्याने ती कमी करण्याच्या मागणीसाठी आधी उच्च न्यायालय, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने गेल्या वर्षभरापासून चार जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक मार्च २०१७ पासून रखडलेली होती. आता पाचही जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये निवडणूक आयोगाने ठरवलेल्या आरक्षणानुसार ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. निवडणुकीसाठी १८ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याला सुरुवात होईल, तर ३० डिसेंबर रोजी उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम
- नामनिर्देशनपत्र दाखल करणे - १८ ते २३ डिसेंबर
- नामनिर्देशनपत्रांची छाननी- २४ डिसेंबर
- उमेदवारी मागे घेणे- ३० डिसेंबर, अपील असल्यास - १ जानेवारी
- मतदान - ७ जानेवारी
- मतमोजणी - ८ जानेवारी
आधीच्या सभागृहातील बलाबल
पक्ष सदस्य
भारिप-बमसं २४
भाजप ११
शिवसेना ०८
काँग्रेस ०४
राकाँ ०२
अपक्ष ०३
अध्यक्षपद सर्वांसाठी खुले
दरम्यान, राज्याच्या ग्रामविकास विभागाने मंगळवारीच जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या राखीव जागा निश्चित करण्यासाठीची सोडत काढली. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गासह राखीव प्रवर्गातील सदस्यांनाही या पदावर संधी असल्याने अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणूनही काही उमेदवारांकडून निवडणूक लढली जाण्याची शक्यता आहे.