मूर्तिजापूर : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कासवी चिखली येथील आत्माराम इंगळे याचे राहते घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने खाक झाले. घरात धान्य शिल्लक नसल्याने पोलिसांनी त्यांना तात्पुरती तातडीची सानुग्रह मदत केली. २५ मे रोजी घरातील सर्व परिवार बाहेर झोपला असताना कासवी येथील आत्माराम सोनाजी इंगळे यांच्या टिन पत्रे असलेल्या राहत्या घराला रात्री १ वाजताचे दरम्यान अचानक आग लागली. त्या त्यांच्या घराची राखरांगोळी झाली असून घरातील अन्नधान्य, भांडीकुंडी तसेच घरातील इतर साहित्य जळून खाक झाल्याने १ लाख रुपयांचेवर नुकसान झाले आहे. इंगळे कुटुंबियांकडे कुठलेच साहीत्य शिल्लक राहिले नसल्याने मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रेय आव्हाळे व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहानुभूती म्हणून लागणारी भांडीकुंडी ५० किलो गहू, ५० तांदुळ तसेच काही नगदी स्वरुपात तात्पुरती सानुग्रह मदत केली आहे. पोलीसांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.(शहर प्रतिनिधी)
राहते घर आगीच्या भक्ष्यस्थानी; साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 3:52 PM