अकोला : नागपूर येथून कोळसा घेऊन येणाºया मालगाडीच्या एका डब्याला लागलेली आग गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वेस्थानकावर विझविण्यात आली. रेल्वे कर्मचाºयाच्या सतर्कतेमुळे ही आग वेळीच विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.नाशिक येथील एकलहरे विद्युत प्रकल्पासाठी कोळसा वाहून नेणाºया एन-नाशिक या ६० डब्याच्या मालगाडीच्या एका डब्यातून धूर निघत असल्याचे बडनेरा रेल्वेस्थानकावर लक्षात आले. परंतु, तोपर्यंत मालगाडी निघून गेली होती. बडनेराहून निघालेल्या या गाडीला मध्ये कुठेच थांबवून आग विझविण्याची सोय नव्हती. त्यामुळे आग लागलेली मालगाडी अकोल्यात येत असल्याचे कळविले गेले. दरम्यान अकोल्याच्या यार्डजवळ रेल्वे थांबवून फायर ब्रिगेडच्या मदतीने आग आटोक्यात आणली गेली. आग विझवित असताना (ओएचडी ) ओव्हर हेड ईलेक्ट्रीकचा पुरवठा काही कालावधीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे अप-डाऊनमार्गावरील ईतरही रेल्वे गाड्यांची वाहतूक प्रभावित झाली होती. आग विझल्याच्या थोड्या वेळानंतर ही मालगाडी नाशिककडे रवाना झाली. मालगाडीला आग लागल्याच्या घटनांमध्ये अलिकडे वाढ झाली असून आग कशामुळे लागताहेत याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.