येथील सीमाबाई सुरेश गवारगुरू (३७) यांचे २० जून रोजी आजाराने निधन झाले. पती सुरेश गवारगुरू यांचे चार वर्षांपूर्वी मोटारसायकल अपघातात निधन झाले. तेव्हापासून मोलमजुरी करून सीमा गवारगुरू या आपल्या तीनही मुलींचे संगोपन करत होत्या. घरी जेमतेम एकरभर शेती. त्यावर उदरनिर्वाह करणे कठीण असताना, मिळेल ती मोलमजुरी करून या माऊलीने आपल्या मुलींच्या शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही. मोठी मुलगी आरती इयत्ता ११ वीत शिकत आहे. भारती ही नववीमध्ये तर आंचल ही इ. सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून सीमा गवारगुरू अकोला व नंतर नागपूर येथील रुग्णालयांत मृत्यूशी झुंज देत होत्या. त्यांना मेंदूचा आजार झाला होता. अखेर काळाने त्यांना हिरावून नेले. आता आरती, भारती व आंचल आईवडिलांच्या प्रेमाला पारख्या झाल्या आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर आता अंधार दाटला आहे. आता आई नाही...बाबा नाहीत. पुढील आयुष्य कसे रेटायचे, शिक्षण कसे घ्यायचे, पोट कसे भरायचे, असे नाना प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले आहेत.
फोटो: मुली व आई
आईवडिलांविना जगावे कसे?
आई घराचे मांगल्य असते, तर वडील घराचे अस्तित्व असतात. ज्या घरात वडील आहेत, त्या घरावर वाकडी नजर टाकायची कुणाची हिंमत होत नाही. परंतु, येथे या तीन बहिणींचा आधारच हिरावला. आधी वडिलांच्या निधनाचे दु:ख पचविले. त्यातून तिघी बहिणी कशाबशा सावरल्या. आईचा एकमेव आधार होता. आता तोही काळाने हिरावला. आईवडिलांविना जगावे कसे? असे प्रश्नचिन्ह या तिघी बहिणींसमोर निर्माण झालेे आहे.