अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील अंजनी खुर्द येथील पाच जण विनोद पवार नामक युवकाच्या मृत्यूस सदोष मनुष्यवधाच्या खटल्याखाली दोषी असल्याचे सिध्द झाल्यानंतर दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश भालेराव यांच्या न्यायालयाने सोमवारी या पाचही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच ५ हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.अंजनी येथे ११ आॅक्टोबर २०११ रोजी मृतक विनोद पवार आणि त्याचे काही मित्र कोजागरी साजरी करण्यासाठी एका ठिकाणी जमले होते. यावेळी दोषी अलका कावरे हिने विनोद पवार याला तिच्या घरी बोलावले होते; मात्र अलका कावरे बाहेर गेल्यानंतर विनोद पवार याने तिच्या घरातील बाहेरच्या परिसरात गळफास घेतल्याची माहिती अलका हिने मृतक विनोदच्या मित्रांना दिली. त्यामुळे एका ठिकाणी जमलेल्या विनोदच्या मित्रांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी विनोद पवार हा जिवंत असल्याचे लक्षात आल्याने त्याच्या मित्रांनी त्यास अकोला येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र उपचारादरम्यान विनोद पवार यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी अलका कावरे, श्रीकृष्ण कावरे, वर्षा कावरे, विजय कावरे आणि राजेश कावरे या पाच जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, २१०, ३४ आणि १२० बी अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश भालेराव यांच्या न्यायालयात झाली असता न्यायालयाने सरकारी पक्षाकडून नऊ साक्षीदार तपासले. आरोपीकडून एका साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून पाचही जणांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्हयाखाली दोषी ठरविल्यानंतर भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२,३४, १२० ब अन्वये आजन्म सश्रम कारावास ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा सुनावली. तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम २०१, ३४, १२० ब अंतर्गत ३ वर्षांचा सश्रम कारावास दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या पाचही आरोपींना या शिक्षा सोबत भोगायच्या आहेत.