अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला ‘श्वसनरोग शास्त्र व क्षयरोग’ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) आणखी पाच जागांना भारतीय वैद्यकीय परिषद (एमसीआय) मान्यता देणार आहे. यासंदर्भात शनिवारी एमसीआयने जीएमसीची पाहणी केली. या पाच जागांना मान्यता मिळाल्यानंतर येथील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण जागा ३५ वर जाणार आहेत.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला वर्ष २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून पहिल्यांदाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांची मान्यता मिळाली होती. त्यावेळी औषध निर्माण शास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या दोन अभ्यासक्रमांना एमसीआयने मान्यता दिली होती. त्यानंतर २०१५-१६ च्या शैक्षणिक वर्षात न्याय वैद्यकशास्त्र, जीवरसायनशास्त्र, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र, विकृतीशास्त्री, शरीरक्रिया शास्त्र या पाच नव्या अभ्यासक्रमांना एमसीआयकडून मान्यता मिळाली होती. तर २०१७-१८ मध्ये शरीररचनाशास्त्र, जनऔषधशास्त्र आणि चर्मरोगशास्त्र हे तीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले होते. यानंतर अकोला जीएमसीतर्फे नेत्र चिकित्सा शास्त्र विषयासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चार जागांना मंजुरी दिली होती. महिनाभरातच दुसऱ्यांदा भारतीय वैद्यकीय परिषदेच्या एका पथकाने शनिवार २१ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. जीएमसी प्रशासनाने एमसीआयचे निकष पूर्ण केल्याने येत्या दोन दिवसात ‘श्वसनरोग शास्त्र आणि क्षयरोग’ या विषयाला पीजीच्या पाच जागांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.क्षयरोग वॉर्डचे स्थलांतरण‘श्वसनरोग शास्त्र आणि क्षयरोग’ या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी क्षयरोग विभागाचा विस्तार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने क्षयरोग वॉर्डाचे स्थलांतरण वॉर्ड क्रमांक २८ मध्ये करण्यात आले. वॉर्डात एकूण ४० खाटांचा समावेश करण्यात आला असून, यामध्ये २० खाटा क्षयरोगासाठी, तर २० खाटा छातीशी निगडित इतर आजारांच्या रुग्णांसाठी असणार आहेत.टीबी वॉर्डाच्या जागेत मच्युरीचे विस्तारीकरणक्षयरोग वॉर्डाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी प्रस्तावित शवविच्छेदन कक्षाची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी शासनाकडून मंजूर निधी प्राप्त झाला असून, लवकरच शवविच्छेदन कक्ष निर्मितीला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. या शिवाय, कान-नाक-घसा विभागाची इमारतदेखील शेजारीच असणार आहे.पंधरा दिवसात ‘ईएनटी’लाही पीजीची मान्यता‘श्वसनरोग शास्त्र आणि क्षयरोग’ या विषयासोबतच ‘नाक-कान-घसा’ विषयालाही पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मागणी केली होती. येत्या १५ दिवसात या विषयाला ही पाच पीजीच्या जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीजीच्या एकूण जागा ४० वर पोहोचणार असल्याची माहिती आहे.