अकोटः तालुक्यातील पनोरी, दणोरी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पठार नदीला पूर आल्याने पुलाचा काही भाग वाहून गेला. त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. दरवर्षी पावसाळ्यात पुलाचा काही भाग वाहून जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या पुलाची तात्पुरती डागडुजी न करता नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यात शनिवार, दि. १० जुलै रोजी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. दमदार पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील नदी-नाले ओसांडून वाहत होते. दरम्यान, तालुक्यातील पनोरी, दनोरी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पठार नदीला पूर आल्यामुळे दरवर्षीप्रमाणे पुलाचा काही भाग वाहून गेला. पूल हा अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, पुन्हा नदीला पूर आल्यास पुलाचा उर्वरित भाग वाहून जाण्याची शक्यता आहे. दनोरी, पनोरीला जोडणारा पूल कालबाह्य झाला असून, त्याची नव्याने निर्मिती होणे अत्यंत गरजेचे आहे. धोकादायक पुलामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पनोरी, दनोरी या दोन्ही गावाचा संपर्क तुटून आरोग्य सुविधा, दळणवळण सुविधा बंद पडल्या आहेत. पनोरी व दनोरीला अकोटशी जोडणारा एकमेव पूल आहे. (फोटो)
---------------------
पुलाची उंची कमी
दनोरी-पनोरी मार्गावरील पुलाची उंची कमी असल्याने पठार नदीला पूर आल्यास पुराचे पाणी पुलावरून वाहते. त्यामुळे दिवसभर गावाचा संपर्क तुटतो. दरवर्षी समस्या निर्माण होत असल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पुलाची उंची वाढवून नवीन निर्मिती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा निवेदन देऊनही परिस्थिती जैसे थे असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
---------------------------
पूर्णेला पूर; पुलाच्या केवळ २ फूट खाली पाणी
गांधीग्राम: शनिवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला होता. वृत्त लिहोस्तोवर पुराचे पाणी गांधीग्राम येथील पुलाच्या केवळ दोन फूट खाली होते. रात्रीच्या सुमारास जास्त पाऊस झाल्यास पूल पाण्याखाली येण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे.